Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महापालिकेचे माहिती व जनसंपर्क विभागातील मुख्य लिपीक वसीम कुरेशी (...

PCMC : महापालिकेचे माहिती व जनसंपर्क विभागातील मुख्य लिपीक वसीम कुरेशी ( वय ५२) यांचे निधन

पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माहिती व जनसंपर्क विभागातील मुख्य लिपीक वसीम कुरेशी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे. (PCMC)

वसीम कुरेशी यांचे शुक्रवारी रात्री ११.३० वाजता बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांचे वय ५२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात्त आई, पत्नी आणि मुले असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर २२ सप्टेंबर रोजी उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मागील महिन्यात वसीम कुरेशी यांना डेंग्यूचे निदान झाले होते. डेंग्यूचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना मोशी येथील ऍकॉर्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालय येथे हलविण्यात आले होते. (PCMC)

याठिकाणी त्यांच्यावर डायलिसीसद्वारे उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांच्यावर ह्रद्याची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. गुरूवारी रात्री उशीरा अचानक त्यांना ह्रद्यविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती पुन्हा खालावली, त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. गेल्या महिनाभरापासून मृत्युशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली.

मुख्य लिपीक वसीम कुरेशी यांनी महापालिकेच्या करसंकलन तसेच माहिती व जनसंपर्क विभागात कार्यरत असताना महत्वपुर्ण जबाबदारी पार पाडली. तसेच समाजात वावरत असताना ते सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्व सामाजिक आणि धार्मिक उत्सवांमध्ये हिरिरीने सहभागी होत असत.

व्यक्तिगत आयुष्यासह महापालिकेच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळा, प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, महापालिकेचा वर्धापन दिन, संविधान दिन, महामानवांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त आयोजित प्रबोधनपर्व, आषाढीवारी पालखी सोहळा, गणेशोत्सव, मोहरम, ईद असे विविध सामाजिक, धार्मिक सण, उत्सव व कार्यक्रम तसेच महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम, कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यामध्ये ते महत्वाची भूमिका बजावत असत.

मनमिळावू, नेहमी सहकार्याची भूमिका ठेवणारे एक कर्तव्यदक्ष कर्मचारी अशी त्यांची महापालिका आणि सहकाऱ्यांमध्ये ओळख होती. त्यांच्या निधनामुळे चांगला मित्र, कर्तव्यदक्ष कर्मचारी आणि माणूसकी जपणारा व्यक्ती गमावल्याची भावना त्यांचे मित्र, सहकारी आणि महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान, त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आयुक्त सिंह यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय