Thursday, October 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कॉम्रेड सिताराम येचुरी यांना पिंपरी चिंचवड शहरात डावे पक्ष पुरोगामी...

PCMC : कॉम्रेड सिताराम येचुरी यांना पिंपरी चिंचवड शहरात डावे पक्ष पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडी यांचे वतीने श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड सिताराम येचुरी यांना पिंपरी चिंचवड शहरातील पुरोगामी पक्ष संघटना, महविकास आघाडी आणि इंडिया आघाडी तर्फे आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (PCMC)

यानिमित्त आयोजित सभेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा महासंघ, स्वराज अभियान, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया(डी वाय एफ आय), अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी पुरोगामी संघटना विद्यार्थी संघटना युवक आदी संघटनांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (PCMC)

यावेळी विविध मान्यवर वक्त्यांनी कॉम्रेड सिताराम येचुरी यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले.

काहींनी त्यांचे प्रत्यक्ष गाठीभेटीचे अनुभव सांगितले. ते एक थोर मार्क्सवादी धर्मनिरपेक्ष विचाराचे पाईक होते. अतिशय साधे आणि समर्पित जीवन जगणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रतिक्रिया

कॉम्रेड सीताराम येचुरी यांच्या नावाने पिंपरी चिंचवड शहरात अभ्यास केंद्र सुरू करणार – मानव कांबळे

संपूर्ण देशात कॉम्रेड सीताराम येचुरी हे शेतकरी, आदिवासी, भूमिहीन, तरुण,विद्यार्थी कामगार यांच्या हक्कांसाठी लढणारे नेते होते. ते तरुणाचे वैचारिक स्फूर्तिस्थान होते.
१९७० ते २००० या कालखंडात त्यांनी विविध आघाड्यांवर जनवादी चळवळीचे नेतृत्व केले.
मार्क्सवादी विचारांचा गाढा अभ्यास असलेल्या या नेत्याने आपल्या अमोघ वाणीने स्वातंत्र्य, लोकशाही आणि समाजवाद याचे महत्व विषद करताना या देशात फॅसिझम विरोधात धर्म निरपेक्ष राजकारणाला महत्व दिले.

त्यांनी आपले मार्क्सवादी विचार कोणावर लादले नाही, कारण ते कठोर किंवा पोथीनिष्ट कम्युनिस्ट नव्हते, केंद्रात २००४ साली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार स्थापन करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. यूपीए सरकारच्या काळात अन्नसुरक्षा कायदा सह सामान्य लोकांच्या हितासाठी लोकोपयोगी कायदे करून करून घेतले. (PCMC)

मार्क्सवाद आणि भारतीय संस्कृती यावर त्यांच्या भाषणातील आशय खूप सकारात्मक होते.

आपण सारेच सर्वांगीण अस्वस्थ भावतालात वावरत आहोत. देशातील धर्म निरपेक्ष, समाजवादी विचाराला अर्थात प्रबोधनाला प्रतिकूल काळ आहे. देशात सामाजिक वातावरण दुभंगलेले आहे. या प्रतिकूल परिस्थितीत प्रबोधनच बचाव करू शकते.
आज प्रबोधनाची गरज आहे.
कोम्रेड सीताराम येचुरी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ पिंपरी चिंचवड शहरात आम्ही शहरात अभ्यास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत. असे मानव कांबळे यांनी आकुर्डी श्रमशक्ती भवन येथील श्रद्धांजली सभेत जाहीर केले.

डॉ. कैलास कदम (अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस)

सीताराम येचुरी यांची राज्यसभेतील भाषणे सरकारच्या जनविरोधी धोरणावर प्रहार करणारी होती. कामगारांच्या हक्काच्या प्रत्येक मुद्द्यावर ते सरकारला जाब विचार होते.

संजोग वाघेरे ( शिवसेना उद्धव ठाकरे गट)

संसदेमध्ये ते अभ्यासपूर्ण भाषणे करायचे, त्यांच्या निधनाने विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकरी यांच्या हितासाठी आयुष्यभर झटणारा एक विचारवंत, तत्वनिष्ठ नेता देशाने गमवला आहे.

ज्योती निंबाळकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, अध्यक्षा, महिला आघाडी)

सीताराम येचुरी यांचा जीवन संघर्ष निवडणूक किंवा सत्तेचा विषय नव्हता, धर्म निरपेक्ष आणि विचारधारेची लढाई होती. त्यांची राज्यसभेतील त्यांची भाषणे जनतेच्या समस्या सरकार समोर मांडणारी होती.

अनिल रोहम (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)

सीताराम येचुरी पोथीनिष्ठ कम्युनिस्ट नव्हते, त्यांनी नेहमी राष्ट्रीय एकात्मता आणि धर्मनिरपेक्ष विचाराची सांगड घातली. त्यांनी नेहमीच डाव्या विचारसरणीला चिकटून राहून, समाजवाद, समता आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर सातत्याने भर दिला.

स्वप्निल जेवळे (आम आदमी पार्टी)
येचुरींचे राजकारण आणि त्यांचे योगदान खूप मोठे होते. समानता, न्याय आणि लोकशाहीसाठी आवश्यक असलेल्या मूल्यांसाठी ते सतत युवक विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत होते. विद्यार्थी चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले.

अपर्णा दराडे ( अखिल भारतीय जनवादी महिला संघटना)

सीताराम येचुरी हे संसदेतील सामान्य माणसाचा आवाज होते. त्यांनी राज्यसभेत सरकारने काय केले पाहिजे, काबाड कष्ट करणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी सरकारने काम केले पाहिजे, यासाठी ते राज्यसभेत सरकारला सूचना करत होते.

प्रताप गुरव (उपाध्यक्ष, बारा बलुतेदार संघटना, महाराष्ट्र)

सीताराम येचुरी यांनी आर्थिक विषमते विरोधात संघर्ष करून पर्यायी धोरण सरकारसमोर सादर केले.

प्रास्ताविक गणेश दराडे (सचिव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पुणे जिल्हा) यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी जितेंद्र छाबडा (अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रवीण कदम (संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष), संजय जाधव (मराठा युवा महासंघ), संजय बारी, प्रदीप पवार, डॉमनिक लोबो, सतीश नायर, अमिन शेख, अविनाश लाटकर, देविदास जाधव, पोन्नपन, बाबासाहेब देशमुख, मुकेश आंबटकर आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देविदास जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय