पिंपरी चिंचवड : क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि प्रशासन अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी अनेक नवीन तंत्रज्ञान राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटीच्या जीआयएस प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या विविध विभागांसाठी ३५ आयटी सॉफ्टवेअर्स एकात्मिक पद्धतीने विकसित करण्यात येत आहे.
याअनुषंगाने, दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थायी समिती सभागृह,मुख्य कार्यालय येथे ८० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांना या प्रणालींचा वापर कसा करावा,मनपा कर्मचा-यांना प्रस्ताव तयार करणे,प्रस्तावाची नोंद ठेवणे, खरेदी/टेंडर प्रक्रिया,वर्क ऑर्डर तयार करणे, इतर स्वयंचलित प्रक्रिया आदींबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण,उपायुक्त संदीप खोत,माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे,कार्यकारी अभियंता हरदिपसिंग बन्सल आदी उपस्थित होते.
प्रकल्प सल्लागार राजा डॉन,सुदीप मिटकरी, एटोसचे अविनाश पाटील,अमित उपाध्याय, धिरज पाटील,साजन सानप,निलेश शिरलकर यांनी सोप्या भाषेत संगणक प्रणालीची माहिती दिली. तसेच, कर्मचा-यांना उदभवणा-या अडचणींवर चर्चा करण्यात आली.
प्रशासनाला शहराची चांगल्या प्रकारे योजना बनवण्यास आणि समस्या सोडवण्यास तसेच कार्यक्षमता वाढणे,कामाचा वेळ कमी होणे, त्रुटी कमी होणे यासाठी जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) आणि ईआरपी (एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग) सारख्या प्रणालींचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रणालीच्या वापरामुळे नागरिकांना जलद आणि कार्यक्षम सेवा,सुधारित पायाभूत सुविधा,अधिक पारदर्शक प्रशासन यासारखे अनेक फायदे मिळणार आहे.जीआयएस प्रणालीद्वारे शहरातील सर्व भौगोलिक माहिती (रस्ते, इमारती, नकाशे इत्यादी) एका ठिकाणी संग्रहित करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.त्याचबरोबर, ईआरपी प्रणालीद्वारे महानगरपालिकेच्या सर्व विभागांना एकात्रित करण्यात येत असून, त्यांचे काम अधिक कार्यक्षम बनविण्यात येत आहे. यामुळे कामाचा वेळ कमी होवून पारदर्शकता वाढणार आहे. या दोन्ही प्रणालींचा वापर करून महानगरपालिका नागरिकांना चांगल्या आणि जलद सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर, शहराचा विकास अधिक चांगल्या प्रकारे नियोजन होण्यास मदत होणार आहे. या प्रणालींचा वापर करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
या प्रणालीद्वारे मनपाच्या स्थापत्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण विभाग, विद्युत विभाग,पर्यावरण,अभियांत्रिकी,अग्निशामक,उद्यान, आरोग्य,भूमी आणि जिंदगी,वैद्यकीय विभाग, कर संकलन,समाज विकास विभाग, जलनि:स्सारण, आकाश चिन्ह परवाना, झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन, क्रीडा विभाग, अणुविद्युत व दूरसंचार, नगररचना, पशुवैद्यकीय, पाणी पुरवठा या विभागांचे कामकाज जलद गतीने चालणार आहे.तसेच, महानगरपालिकेच्या कामकाजाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
ईआरपी, जीआयएस आणि डिजिटल वर्कफ्लो मॅनेजमेंट या तीनही प्रणाली एकमेकांशी जोडल्या जात असून, यामुळे महानगरपालिकेचा जीआयएस डेटाबेस सतत आणि रिअल टाइम आधारावर अपडेट होईल. नागरिकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे सेवा प्रदान करणे, महानगरपालिकेच्या कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे, असे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले.