अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि. १५ – ”परमेश्वराने पृथ्वीतलावर पाठवताना प्रत्येकाची भूमिका ठरवलेली असते.त्याप्रमाणे आपली ज्या भूमिकेसाठी निवड केली,ती भूमिका आनंदाने स्वीकारणे हेच आनंदी जीवनाचे रहस्य असल्याचे मत पत्रकार अनिल कातळे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
ओतुर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात ‘आनंदी जीवनाचे रहस्य’ या विषयावर कातळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मेळाव्याला सुरुवात झाली. या माजी विद्यार्थी मेळाव्यात सन १९९० मधील वाणिज्य शाखेचे मुंबई,नवी मुंबई,पालघर, पुणे,पिंपरी चिंचवड,जुन्नर येथील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी बहुसंख्येने होते.
कातळे पुढे म्हणाले की, ”आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काही – ना काही कमतरता असते. त्या कमतरतेमुळे खचून, डगमगून न जाता आपल्याला जीवनाचा खेळ खेळावाच लागतो. आयुष्याची खरी किंमत तेंव्हाच कळते,जेव्हा संघर्ष करण्याची वेळ येते.जी माणसे स्वतःच्या अडचणीच्या आणि संघर्षाच्या काळात आलेल्या परिस्थिती कडे संधी म्हणून सामोरे जातात ते कधीच दुःखी होत नाहीत.त्यामुळे आयुष्याची वाटचाल करताना येणा-या प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने सामना करावा असेही कातळे यांनी सांगितले.
या स्नेहमेळाव्याचे अध्यक्ष ॲड.सलीम पटेल तसेच गबाजी गाडेकर,राजेंद्र कुंजीर,लक्ष्मण गटकळ,समाधान तांबे,शर्मिला खर्गे,आरती गटकळ, मंगेश डुंबरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. भूतकाळातील आठवणींना उजाळा देत आपले अनुभव आणि विचारांचे आदान-प्रदान केले. आयुष्यात आलेले चढ,उतार,कडू, गोड आठवींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला.सहभागी विद्यार्थ्यांचा फेटा बांधून तसेच पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
शायर सलीम पटेल यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.वंदना गावडे,मंगेश डुंबरे,शांता रोकडे, सतीश थोरात,मनीषा कासवा,आरती गटकळ,पांडुरंग शिंदे आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. सुरवातीला हयात नसलेल्या सहका-यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक बाळासाहेब वाळूंज, सूत्रसंचालन उद्योजक उल्हास पानसरे यांनी आणि पत्रकार रोहित खर्गे यांनी आभार मानले.