Thursday, October 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आरक्षणाला विरोध असणाऱ्या राहुल गांधी यांचा खरा चेहरा जगासमोर येतोय...

PCMC : आरक्षणाला विरोध असणाऱ्या राहुल गांधी यांचा खरा चेहरा जगासमोर येतोय – शंकर जगताप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात पिंपरीत भाजपचे काळ्या फिती बांधून आंदोलन (PCMC)

अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांचे देशातील आरक्षण संपविण्याचे वक्तव्य


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : अमेरिकेच्या चालू दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीवर टीका करून देशातील सामाजिक आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत वक्तव्य केले. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भागात पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपा पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात काळया फिती बांधून आंदोलन केले. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. (PCMC)

यावेळी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार अमर साबळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, आमदार अमित गोरखे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माऊली थोरात, महेश कुलकर्णी, मोरेश्वर शेडगे, भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, शितल शिंदे, अजय पाताडे, भाजपा उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, डॉ. संजीवनी पांड्ये यांच्यासह माजी नगरसेवक – नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी वॉशिंग्टनमधील जॉर्जटाऊन विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधताना “भारत देश सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर देशातील सामाजिक आरक्षण संपविण्याबाबत काँग्रेस पक्ष विचार करेल,” असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शहर भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. (PCMC)

शंकर जगताप म्हणाले की, राहुल गांधी यांचे वक्तव्य विषारी आहे. ते पंतप्रधान न झाल्यामुळे निराशेतून देशावर टीका करत आहेत.

“लोकशाहीत अन्यायकारक परिस्थितीवर भाजपच्या निवडणूक विजयांना दोष देऊन मतदारांचा अपमान करणे लज्जास्पद आहे. भारताची प्रतिष्ठा खराब करून, राहुल गांधींनी त्यांचा आत्मविश्वास गमावल्याचे दाखवून दिले आहे, असा आरोप जगताप यांनी केला.

भाजपा संविधान बदलणार, असा प्रचार करणारे स्वतः आज संविधान बदलण्याचीच भाषा करत असल्याने काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आला आहे. काँग्रेस जेव्हा निवडणुका हरते तेव्हाच लोकशाही रक्षणाचा कांगावा करतात. राहुल गांधी यांचे खरे रंग आता स्पष्ट झाले आहेत. ते आरक्षण रद्द करण्यासाठी दार उघडत आहेत, अशी टीका जगताप यांनी केली.

“भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी जातीवर आधारित आरक्षणाला विरोध केला. काँग्रेस पक्षाने नेहरू यांच्यापासून इंदिरा गांधी आणि राजीव गांधींपर्यंत संसदेत मंडल आयोगाला विरोध केला. समाजावर आधारित आरक्षणाऐवजी ‘आर्थिक निकषांवर आरक्षण’, असा युक्तिवाद करून दीर्घकाळापासून मंडल आयोगाला विरोध केला. सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांवरील अन्यायाचा हा काँग्रेसचा इतिहास आहे, याकडे जगताप यांनी लक्ष वेधले.

भाजप आहे तोपर्यंत कोणीही आरक्षण रद्द करू शकणार नाही, असा पुनरुच्चार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप हा लोकांच्या पाठिंब्याने जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे आणि सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे, असे जगताप यांनी सांगितले.

यापूर्वी भारताच्या आण्विक धोरणांवर टीका करणारे अमेरिकन राजकारणी इल्हान ओमर यांच्यासोबत राहुल गांधी यांच्या कथित भेटीवरही त्यांनी टीका केली.

प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार अमर साबळे यांनी राहुल गांधी यांच्या भारतविरोधी घटक आणि कटकारस्थानांशी असलेल्या कथित संवादाचा तीव्र निषेध केला. “भाजपने राहुल गांधींना शहाणे होण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या परदेश दौऱ्यांमध्ये भारताविरुद्ध विषारी टीका करणे थांबवावे,” असे त्यांनी सुनावले.

राहुल गांधी देशात आल्यावर जर जिल्हयात आले तर त्यांना पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही साबळे यांनी दिला.

काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असताना भाजपा महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला.

संबंधित लेख

लोकप्रिय