शब्दधन काव्यमंचाचा उपक्रम (PCMC)
पिंपरी चिंचवड – नाशिक हमरस्ता, भोसरी येथील
‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा…’ या मराठी साहित्यविश्वातील आगळ्यावेगळ्या कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (PCMC)
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे पिंपरी – चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते ज्ञानेश्वर कोटगिरे, युवा सामाजिक कार्यकर्ते ओंकार भागवत, अशोकमहाराज गोरे, शब्दधनचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करून आणि उसाच्या चरकाचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. (PCMC)
सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून आयोजनामागील भूमिका मांडली. तर तानाजी एकोंडे यांनी संत चोखामेळा यांच्या ‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा…’ या अभंगाचे गायन केले.
याप्रसंगी आण्णा जोगदंड म्हणाले.. “पारंपारिक पद्धतीने उसाचा रस काढण्याची पूर्वीची पद्धत आता इतिहास जमा होत असतानाही काही माणसे या परंपरेचे जतन करीत आहेत.
अर्थात हे काम कष्टदायक असले तरी यातून वीज बचत होते. संत चोखामेळा म्हणतात ऊस वाकडा तिकडा असला तरी त्याचा रस गोड असतो. त्यामुळे माणसांनी वरच्या रंगाला न भुलता खरा जीवनरस अनुभवला पाहिजे.”
आयुर्वेदातील उसाच्या रसाचे महत्त्व, रसाचे माधुर्य या विषयांसह अल्पभूधारक शेतकऱ्यांची दुरवस्था, ऊसतोडणी मजुरांची बिकट अवस्था अशा संवेदनशील आशयांवरील वैविध्यपूर्ण कवितांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. आय. के. शेख, शोभा जोशी, कैलास भैरट, जयश्री गुमास्ते, शामराव सरकाळे, फुलवती जगताप, शिवाजी शिर्के, रेवती साळुंखे, बाळकृष्ण अमृतकर, जयश्री श्रीखंडे, रशीद अत्तार, केशर भुजबळ, अण्णा उमरगे, योगिता कोठेकर, राजू जाधव, दत्तात्रय म्हस्के, सुभाष चटणे, पीतांबर लोहार, अंतरा देशपांडे, राजेंद्र घावटे यांनी आशयपूर्ण कविता सादर केल्या . कवींना यावेळी झाडाची रोपे भेट म्हणून देण्यात आली.
रसवंती चालक गणेश हंगळ, अनिल हंगळ या प्रसंगी म्हणाले, ‘लाकडी उसाचा चरक आता हल्ली कुठे जास्त नसतो. छोट्या मुलांना याचे आकर्षण असते. गाव खेड्यात गेल्याचा शहरातील माणसांना एक वेगळा आनंद देण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही उपजीविकेच्या साधनाबरोबर करीत असतो.”
हिरामण देवरे, शंकर नाणेकर, काळुराम लांडगे, मुग्धा कंक,अजित जगदाळे, सचिन गरुड, वर्षा जगदाळे, दिलीप फाकटकर, अण्णा कुंभार, भरत कुंभार, नारायण भागवत, पांडुरंग सुतार, आदित्य जाधव, बाळासाहेब शिंदे, राज पवार यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. अरुण परदेशी यांनी आभार मानले.