Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अग्निसुरक्षा प्रमाणपत्राबाबतच्या शिबिरास व्यवसायधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

PCMC : अग्निसुरक्षा प्रमाणपत्राबाबतच्या शिबिरास व्यवसायधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत गुरुवार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिखली, कुडळवाडी व तळवडे परिसरातील व्यावसायिक मालमत्ताधारकांना ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपतत्र’ प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यासाठी चिखली, सोनवणे वस्ती येथील ‘टाऊन हॉल’ येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले. याप्रसंगी अग्निशमन विभागाचे उपायुक्त, मनोज लोणकर, उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांनी व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. (PCMC)

मार्गदर्शन शिबिरामध्ये व्यावसायिक मालमत्ताधारकांना ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर, शिबिरामध्ये व्यावसायिक मालमत्ताधारकांच्या अडचणींचा तत्काळ निरसन करण्यात आले. व्यावसायिक मालमत्ताधारकांना अग्निशमन उपकरणे हाताळण्याची पद्धती, व्यावसायिक मालमत्ता अग्निसुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची व यंत्रणांची इत्थंभूत माहिती देण्यात आली.

आत्तापर्यंत ५,०९३ व्यावसायिक मालमत्ताधारकांना नोटिस

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील मालमत्तांच्या सुरक्षेसाठी अग्निप्रतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये, मनपा क्षेत्रातील व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक, संस्थात्मक व वैद्यकीय इमारतींचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण झालेल्या मिळकतीपैंकी धोकादायक मिळकतींची ओळख पटवून मिळकतीमध्ये अग्निशमन यंत्रणांची उपलब्धता, ये-जा करण्याचा सुरक्षित मार्ग, धोकादायक पदार्थांचा साठा, मिळकतीमध्ये निवासी वास्तव्य इत्यादी बाबींचा विचार करून शहरात अग्निप्रतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण सुरू आहे.

शहरातील व्यावसायिक मालमत्ताधारकांना आपली मालमत्ता अग्निसुरक्षित करण्यासाठी अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. ज्यांनी अद्यापि पूर्तता केली नाही, अशा ५,०९३ मालमत्ताधारकांना नोटिस बजाविण्यात आली आहे. यापैकी, ९७० मालमत्ताधारकांची प्रकरणे विभागामध्ये आली आहेत. यामधून ४२९ मालमत्तांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून ३१३ मालमत्तांची प्रकरणे व्यावसायिक अग्निसुरक्षा प्रमाणपत्राकरिता प्रक्रियेत आहेत. याबरोबरच, आतापर्यंत ९२ व्यावसायिक मालमत्ताधारकांना ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात आले आहे. (PCMC)

अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न केल्याने आत्तापर्यंत ३७ मालमत्ता सिल!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील व्यावसायिक मालमत्ताधारकांना दोन वेळा नोटिस बजाविल्यानंतरही ३७ व्यावसायिक मालमत्ताधारकांनी अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न केल्याने त्या मालमत्ता सिलबंद करण्यात आल्या आहेत. (PCMC)

शहरातील सर्व व्यावसायिक मालमत्ताधारकांनी ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ प्राप्त करणे आवश्यक

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील व्यावसायिक मालमत्ता अग्निसुरक्षित होण्यासाठी अग्निशमन विभागाकडून ज्या व्यावसायिक मालमत्तांनी अग्निसुरक्षा उपाययोजनांची पूर्तता केली आहे, अशा मालमत्तांना ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ देण्यात येत आहे. शहरामध्ये आगीच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व व्यावसायिक मालमत्तांनी अग्निसुरक्षा उपाययोजनांची पूर्तता करून ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ प्राप्त करणे आवश्यक आहे.

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

व्यावसायिक मालमत्ताधारकांनी मालमत्ता सिलबंद होण्याची कारवाई टाळावी

शहरातील व्यावसायिक मालमत्तांना ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ प्राप्त करून घेण्यासाठी नोटिस बजाविण्यात आल्या आहेत. शहरातील ज्या व्यावसायिक मालमत्ताधारकांनी अद्यापि आवश्यक अटींची पूर्तता केली नसेल, तर त्यांनी त्वरित पूर्तता करून घ्यावी. अग्निशमन विभागाने आयोजित केलेल्या शिबिरांच्या माध्यमातून इत्थंभूत माहिती देण्यात येत आहे. व्यावसायिक मालमत्ताधारकांनी आपली मालमत्ता अग्निसुरक्षित करून ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ प्राप्त करावे व मालमत्ता सिल होण्याची कटू कारवाई टाळावी.

प्रदीप जाभंळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

व्यावसायिक मालमत्ताधारकांनी त्यांची मिळकत अग्नि सुरक्षित करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील व्यावसायिक मालमत्तांना ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व त्याबाबतची माहिती मिळण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ज्या व्यावसायिक मालमत्ताधारकांना प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील, अशांनी जवळच्या अग्निशमन केंद्राकडे संपर्क साधून आपल्या शंकाचे निरसन करून घ्यावे. यासोबतच व्यावसायिकांनी मनपाने त्यांना नोटीस बजाविण्याची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन प्रमाणपत्रासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी.

मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशमन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

संबंधित लेख

लोकप्रिय