Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सोसायटीधारक राजकीय षडयंत्राचे ‘शिकार’ ; निवडणुकीच्या काळात सतर्कतेची गरज!

PCMC : सोसायटीधारक राजकीय षडयंत्राचे ‘शिकार’ ; निवडणुकीच्या काळात सतर्कतेची गरज!

चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांचे आवाहन (PCMC)

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोसायटीधारकांना राजकीय नेते, कार्यकर्त्यांकडून बदनाम करण्याचा प्रयत्न

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुक राजकीय व्यक्ती सोसायटीधारकांच्या समस्या मीच सोडवणार असा दावा करीत आहेत. ‘‘सोसायटीधारकांना तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी मीडियाचे प्रतिनिधी येत आहेत… आपल्या समस्या मांडा आणि सोडवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही मीडियासमोर बोला..’’ असा सापळा रचला जात आहे. त्याच ‘बाईट’ राजकीय हेतूने सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात आहेत. यामध्ये सोसायटीधारक नाहक ‘शिकार’ होत आहेत. त्यामुळे सोसायटीधारकांनी राजकीय षडयंत्राचा बळी ठरू नये, सतर्क रहावे, असे आवाहन चिखली-मोशी-चऱ्होली- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केले आहे. (PCMC)

पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे अडीच ते तीन हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. सोसायटीधारक हा निवडणुकीत ‘निर्णायक’ मतदार आहे. त्यामुळे या मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून विविध ‘फंडे’ लढवले जात आहेत. शहरात सर्वच सोसायटी फेडरेशन सोसायटीधारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्त्याने प्रयत्न करीत असतात. सोसायटीधारकांची वज्रमूठ आहे. पण, निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय मंडळीने ज्या सोसायटीमध्ये समस्या आहे, तिचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी भाष्य केले आहे. (PCMC)

संजीवन सांगळे म्हणाले की, १९९७ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत हद्दीलगतच्या गावांचा समावेश झाला. त्यानंतर समाविष्ट गावांमध्ये महानगरपालिका पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करेल, या अपेक्षेने नवीन गृहप्रकल्प होण्यास सुरूवात झाली.

गृहप्रकल्पांना परवानगी देताना प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे तयार झाल्या नाहीत. गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये गृहप्रकल्प आणि सदनिकाधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. बांधकाम व्यावसायिकांचे दुर्लक्ष, मनमानी आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, वीज पुरवठा, रस्ते, गार्डनसह ॲमिनिटीज्‌ अशा समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी शहरातील सर्वच सोसायटी फेडरेशन आपआपल्या परीने ताकदीने काम करीत आहेत.

आता सोसायटी फेडरेशनेचे पदाधिकारी ज्यांनी पुनावळेतील कचरा डेपो रद्द केला… ज्यांनी सोसायटीधारकांवर लादलेला उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती दिली… ज्यांनी चऱ्होलीतील प्रस्तावित कचरा हस्तांतरण केंद्राचे आरक्षण रद्द केले… ज्यांनी आपल्या सोसायटी परिसरात रस्ते विकसित केले… गार्डन विकसित केले… ज्यांनी मोशी कचरा डेपोवरील कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वयीत केले… आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील १०० एमएलडी पाणी शहरात आणले… सोसायटीधारकांच्या अडीअडचणींना बिल्डर- प्रशासन यांच्या मनमानीविरोधात सोसायटीधारकांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला, अशा नेत्याच्या पाठिशी सोसायटीधारक राहणार आहेत.

राजकारणामुळे सोसायटींमधील वातावरण दुषित…

बांधकाम व्यावसायिक धार्जिणे राजकीय नेते आजच्या घडीला सोसायटीधारकांच्या समस्यांचे राजकीय भांडवल करु पाहत आहेत. त्यासाठी विशिष्ट व्यक्ती सोसायटीधारकांच्या ‘व्हॉट्सॲप ग्रुप’मध्ये ‘‘सोसायटीच्या समस्या जाणून घेण्यासाठी मीडियाचे प्रतिनिधी येणार आहेत. आपल्या समस्या मांडा आणि प्रशासनासमोर पोहोचवा…’’ असा सांगतात.

त्याद्वारे प्रतिक्रियाचे व्हीडिओ तयार करुन विशिष्ट राजकीय हेतूने सोशल मीडियावर प्रसारीत केले जात आहेत. सोसायट्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये खोट्या माहितीच्या आधारे ‘निगेटिव्ह मॅसेज’ टाकणे, सोसायटीधारकांच्या भावना भडकावणे आणि राजकीय नेत्यांबाबत नकारात्मक व्हीडिओ फॉरवर्ड करणे… अशा बाबींमुळे सोसायटीमधील वातावरण दुषित होत असून, सोसायटीमध्ये दुही निर्माण होत आहे. परिणामी, सोसायटी, सोसायटीचे पदाधिकारी व प्रतिनिधी आणि त्या परिसराची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे सोसायटीधारकांनी अशा राजकीय हेतुने नियोजित केलेल्या ‘बाईट’ देवू नयेत आणि सोसायटींच्या ग्रुपमध्ये राजकीय निगेटिव्ह पोस्ट करण्याबाबत प्रतिबंध करावा.

ज्यामुळे वादाचे मुद्दे उपस्थित होणार नाहीत आणि सोसायटीधारकांची वज्रमूठ कायम राहील. सोसायटी फेडरेशन आणि सोसायटीधारक हे कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व करीत नाहीत. प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या मनमानीविरोधात जे नेते, पदाधिकारी त्या-त्या भागात सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतात. त्यांच्यासोबत शहरातील सोसायटी फेडरेशन उभा राहते, असा दावाही सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय