आमदार महेश लांडगे आणि महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – कारखानदारी, लघुउद्योग ही पिंपरी-चिंचवड शहराची प्रमुख ओळख आहे. या उद्योग क्षेत्राचा शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. उद्योग, उद्योजक यांच्या पुनर्वसनासाठी लवकरच ‘‘ॲक्शन प्लॅन’’ बनवण्यात येईल. शहरातील लघु उद्योजकांवर अतिक्रमण कारवाई होणार नाही, असा विश्वास लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिला आहे. (PCMC)
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे उपस्थित होते.
यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दीपक करंदीकर, महापालिका उपायुक्त मनोज लोणकर, क क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, फ क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप, प्रकाश गुप्ता, गोरख भोरे उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, कुदळवाडी-चिखली येथील अतिक्रमण कारवाईबाबत प्रशासना सोबत बैठक झाली होती. त्यावेळी रस्ते आणि आरक्षणांमध्ये अडथळा ठरणारी, इंद्रायणी नदी प्रदूषण, वायू-ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणारी आणि अनधिकृत भंगार व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे निश्चित केले होते.
पण, प्रशासानाने सरसकट कारवाई केली. त्यामुळे लघु उद्योजक आणि भूमिपुत्रांचे नुकसान झाले आहे. उद्योग, उद्योगक्षेत्र आणि उद्योजक यांच्या सर्व समावेशक विकासासाठी नेहमीच पाठीशी राहण्याची भूमिका भाजपा आणि आमची आहे. यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
.. अशा आहेत उद्योजकांच्या मागण्या!
1. चिखली कुदळवाडी येथील कारवाई झालेल्या उद्योजकांना तात्पुरत्या स्वरूपात मशीन, कच्चामाल तसेच इतर साहित्य ठेवण्यासाठी सोय करावी.
2. महापालिकेच्या डीपी प्लॅन नुसार आरक्षण असतील तर ते विकसित करण्यासाठी मराठा चेंबर सहकार्य करेल.
3. वर्षानुवर्ष लघु उद्योजकांचा पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात मोलाचा सहभाग आहे. त्यांना त्रास न होण्यासाठी उपाययोजना किंवा ॲक्शन प्लॅन तयार करावा.
प्रतिक्रिया:
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अधिकारी आणि आमची संयुक्त बैठक झाली. कुदळवाडी प्रमाणे सरसकट कारवाई करुन लघुउद्योजक व भूमिपुत्रांना नाहक त्रास होईल, अशी कारवाई प्रशासनाने करु नये, अशी ठाम भूमिका आम्ही प्रशासनासमोर मांडली. (PCMC)
उद्योग क्षेत्रासाठी शहरात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे. नियम-अटी आणि विविध परवानग्यासाठी महापालिका प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे. शहरातील कोणत्याही उद्योगाला कुदळवाडी प्रमाणे त्रास होवू नये. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची जबाबदारी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
PCMC : पिंपरी-चिंचवडमधील लघु उद्योजकांना लोकप्रतिनिधी- प्रशासनाचा ‘विश्वास’; मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत सकारात्मक भूमिका
- Advertisement -