पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानतर्फे देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय भागवत धर्म पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे पिंपरी-चिंचवडचे विशेष प्रतिनिधी सुनील लांडगे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष अँड. रवींद्र पाटील यांनी दिली. (PCMC)
भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या राज्यातील पत्रकारांना संस्थानचे माजी अध्यक्ष सहकारमहर्षी कै. भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ २०१९ पासून भागवत धर्म प्रसारक पुरस्कार देण्यात येतो.
यापूर्वी हा पुरस्कार सूर्यकांत भिसे, शंकर टेमघरे, मनोज मांढरे, राजेंद्रकृष्ण कापसे यांना प्राप्त झाला आहे. यंदाचा पुरस्कार देहू-आळंदी पालखी सोहळा आणि वारकरी संप्रदायातील वार्तांकनाची दखल घेत लांडगे यांना जाहीर झाला आहे. (PCMC)
वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या लांडगे यांनी आषाढी वारी प्रसारासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून उल्लेखनीय काम केले आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लोकाभिमुख होण्यासाठी सन २००० पासून देहू ते पंढरपूर पायी वारी करून तुकोबारायांचा सोहळा दैनिक सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून असंख्य वैष्णवांपर्यंत पोहोचवला आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळा, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अशा विविध सोहळ्यांचे वार्तांकन आणि त्याबद्दल विशेष लेख लिहून वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम केले आहे. (PCMC)
श्री विठ्ठलाची मूर्ती, मानाचा वारकरी फेटा आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे वितरण आषाढी एकादशीच्या दिवशी सहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत मुक्ताबाई मठात होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
PCMC : ज्येष्ठ पत्रकार सुनील लांडगे यांना भागवत धर्म पुरस्कार जाहीर…
---Advertisement---