Monday, November 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा, महापालिका उभारणार ज्येष्ठ नागरिक भवन

PCMC : ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा, महापालिका उभारणार ज्येष्ठ नागरिक भवन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात “ज्येष्ठ नागरिक भवन” उभारणार असून विविध सोयी सुविधांनी युक्त असे भवन हे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ ठरणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आणि ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त त्यांना शुभेच्छाही दिल्या. (PCMC)

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून दि.१ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथील ग.दि.माडगुळकर नाट्यगृह येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, बाबुराव फुले, ईश्वरलाल चौधरी, शांताराम सातव, हेमचंद्र जावळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उप निरीक्षक दिनकर गावडे, व्याख्याते अशोक देशमुख,डॉ. श्रीकृष्ण जोशी, आपटे काका, समाज विकास विभागाच्या रेश्मा पाटील, संतोषी चोरघे, प्रियंका रणसिंग, यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले, महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या जेष्ठ नागरिक भवनामध्ये त्यांच्यासाठी भव्य ऑडीटोरियम, सुसज्ज पार्किंग सुविधा, हॉल, ज्येष्ठ नागरिक संघासाठी स्वतंत्र कार्यालय, अशा अनेक सोयीसुविधा या भवनामध्ये नागरिकांसाठी उभारण्यात येणार आहेत. तसेच विविध योजना, उपक्रम, कार्यक्रम आणि जेष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आयुक्त सिंह पुढे म्हणाले, राज्यशासन आणि महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरु करून प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना अत्यंत महत्वकांशी आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्यने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत उपस्थित नागरीकांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. (PCMC)

खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम, योजना, कार्यक्रम घेतले जातात. त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, तसेच आपले आरोग्य सांभाळून आनंदी व निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले.

प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, इतक्या मोठ्या संख्यने एकजूट असलेली पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ ही पहिलीच ज्येष्ठ नागरिक संघटना आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना तळागळात पोहचवण्यात या संघटनेची महत्वाची भूमिका आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेकडे आतापर्यंत ४ हजार ४०० अर्ज प्राप्त झाले आहेत. महापालिकेच्या वतीने विविध विकासात्मक प्रकल्प उभारताना ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी सुविधांचाही विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.

प्रारंभी ज्येष्ठ व्याख्याते अशोक देशमुख यांनी आपल्या मधुर आणि मिश्कील वाणीतून ज्येष्ठांचे आनंदी जीवन या विषयावर मनोरंजनात्मक प्रबोधन केले.

दरम्यान, उपस्थित ज्येष्ठ नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, या‌द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशी शपथ घेऊन १००% मतदानाचा निर्धार केला.

यावेळी आयुक्त शेखर सिंह आणि खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. (PCMC)


पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी १३४ ज्येष्ठ नागरिक महासंघ कार्यरत असून ज्येष्ठ नागरिक संघांना दरवर्षी समाज विकास विभागामार्फत भेटवस्तू देण्यात येतात. सन २०२२-२३ यावर्षी ११६ ज्येष्ठ नागरिक संघाना एलईडी टीव्ही देण्यात आले होते. तर सन २०२३-२४ यावर्षी १०२ ज्येष्ठ नागरीक संघांना साऊंड सिस्टिम व २६ ज्येष्ठ नागरिक संघांना प्रत्येकी १ टेबल व ५० खुर्च्या देण्यात आलेल्या होत्या. सन २०२४-२५ या वर्षामध्ये १३४ ज्येष्ठ नागरीक संघांना भजनी साहित्य देणेबाबत ज्येष्ठ नागरिक महासंघांने मागणी केली होती. या मागणीनुसार सर्व १३४ ज्येष्ठ नागरिक संघांना प्रत्येकी १ हार्मोनिअम (पेटी), १ तबला जोड, १२ टाळ व २ सतरंजा देण्यात येणार असून त्यापैकी ३ ज्येष्ठ नागरिक संघाना प्रातिनिधिक स्वरुपात आयुक्त शेखर सिंह आणि खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

दुपारच्या सत्रात गीत गायन आणि नृत्य सादरीकरणाद्वारे या कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी नरळे यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक तसेच विकास गायकांबळे यांनी केले.

संबंधित लेख

लोकप्रिय