पिंपरी चिंचवड – महाराष्ट्र शासनाचा २०२५-२६ वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी त्यावर आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यांनी अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत सरकारच्या धोरणांचे विश्लेषण केले. अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या भविष्याचा रोडमॅप पहायला मिळतो, असेही ते म्हणाले. औद्योगिक प्रगती, पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्राचा विकास आणि सामाजिक कल्याण या चार स्तंभांवर राज्याचा अर्थसंकल्प उभा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार जगताप यांनी व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख विचारांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसून येत असल्याचे नमूद केले. (PCMC)
उद्योग व रोजगार:
शंकर जगताप यांनी नमूद केले की, महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणांतर्गत पाच वर्षांत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे स्वागतार्ह पाऊल असले तरी, याची अंमलबजावणी अत्यंत प्रभावी पद्धतीने होणे आवश्यक आहे. चिंचवड आणि पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक हब असल्यामुळे या धोरणाचा फायदा स्थानिक युवकांना मिळावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागासाठी ‘महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन’ या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे स्थानिक उद्योगांना फायदा होईल आणि टेक्निकल टेक्सटाईल क्षेत्रातील नव्या संधींना चालना मिळेल. तसेच, पुण्यात ११ मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांसाठी ‘नवीन गुंतवणूक आणि प्रोत्साहन योजना’ लागू करण्याच्या घोषणेवर आमदार जगताप यांनी समाधान व्यक्त केले. या योजनेंतर्गत पुण्यात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित होईल, तसेच उद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल. (PCMC)
पायाभूत सुविधा:
अर्थसंकल्पात वाढवण बंदराच्या विकासात २६% सहभाग, मुंबईसाठी तिसरे विमानतळ, बुलेट ट्रेन स्थानक, तसेच महामार्ग, मेट्रो आणि विमानतळ प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये पिंपरी-चिंचवडच्या विकासाला चालना देणाऱ्या योजनांचा समावेश असल्यास स्थानिक नागरीकांना अधिक फायदा होईल. पुणे-शिरूर उन्नत मार्ग, तळेगाव-चाकण उन्नत मार्ग यांसारख्या प्रकल्पांना अर्थसंकल्पात मिळालेल्या निधीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
हरित विकास:
राज्यातील ऊर्जा नियोजन आणि स्वस्त हरित ऊर्जा खरेदीमुळे आगामी पाच वर्षांत १.१३ लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे. तसेच, ६ हजार डिझेल बसचे सीएनजी व एलएनजीमध्ये रूपांतर होणार असल्याने प्रदूषण नियंत्रण व सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळेल.
कृषी व सिंचन:
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ५० हजार शेतकऱ्यांच्या शेतीचे आधुनिकीकरण, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी ८८ हजार ५७४ कोटी रुपये आणि जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ४२२७ कोटी रुपयांची तरतूद या बाबींवर आमदार शंकर जगताप यांनी समाधान व्यक्त केले.
सामाजिक कल्याण:
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत ३३,२३२ कोटी रुपयांचे वाटप हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल आहे. तसेच, २४ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट हे स्त्री सक्षमीकरणाला हातभार लावेल. ‘प्रधानमंत्री आवास योजना’साठी केलेली तरतूद तसेच, नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच येणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना घरे मिळण्याची शक्यता वाढेल.
पर्यटन व सांस्कृतिक वारसा:
पर्यटन धोरण २०२४ अंतर्गत १० वर्षांत १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक हे मोठे उद्दिष्ट आहे. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या घोषणेस आमदार जगताप यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, स्थानिक पर्यटन क्षेत्रालाही प्रोत्साहन मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. (PCMC)
आमदार शंकर जगताप यांनी अर्थसंकल्पातील विविध तरतुदींचे स्वागत करतानाच त्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याची गरज असल्याची आग्रही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
PCMC : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या भविष्याचा रोडमॅप – आमदार शंकर जगताप
- Advertisement -