Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : वर्ल्ड वॉटर फोरम मध्ये पीसीसीओईच्या विजय सावंतने केले प्रतिनिधित्व

PCMC : वर्ल्ड वॉटर फोरम मध्ये पीसीसीओईच्या विजय सावंतने केले प्रतिनिधित्व

फोरमचे अध्यक्ष लॉएक फॉचोक यांनी विजय सावंतच्या संशोधनाचे केले कौतुक (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. २८ – मागील आठवड्यात बाली, इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या “१० व्या वर्ल्ड वॉटर फोरम” मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी विजय रणजीत सावंत यास मिळाली. (PCMC)

वर्ल्ड वॉटर फोरम मागील ३० वर्षांपासून पाणी समस्यांवर संशोधन करून उपाय सुचविणाऱ्या संशोधकांना जागतिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणारी नामांकित संस्था आहे. या संस्थेच्या वतीने दर तीन वर्षांनी जागतिक पाणी परिषद भरवली जाते.

यामध्ये जगभरातील युवा संशोधक पाणी समस्या बाबत प्रबंध सादर करीत असतात. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी या दहाव्या वॉटर फोरम मध्ये उपस्थित राहून युवा संशोधकांना प्रोत्साहित केले. यामध्ये विजय सावंत याने “शेती व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पाणी व्यवस्थापन” कसे करता येईल या विषयावर प्रबंध सादर केला. (PCMC)

त्याने पाण्याचे नैसर्गिक स्रोत शोधणे, त्यात सुधारणा करणे, त्याचे व्यवस्थापन करणे, पाण्याची बचत व साठवणूक करण्यासाठी व्यवस्थापन व त्यासाठी उपाययोजना सुचविणे यावर लक्ष केंद्रित करून सादरीकरण केले.

या परिषदेस १६० देशातील ६४ हजारांहून अधिक संशोधक व नागरिक हजर होते. यामध्ये युरोप आणि ग्लोबल साऊथ मधील राजकीय नेते, उद्योजक, अधिकारी यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

विजय सावंत याच्या संशोधन प्रबंधाचा पहिल्या सर्वोत्तम १० संशोधकांमध्ये समावेश करण्यात आला. हे भारतातील युवा संशोधकांना प्रेरणादायी व अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन पीसीटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी विजय सावंत याचे कौतुक करताना केले.

उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनीही विजय सावंत यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

लोकप्रिय