चुकीच्या पद्धतीने लावलेला मालमत्ता कर अखेर रद्द (PCMC)
– सोसायटी फेडरेशनच्या पाठपुराव्याला मिळाले यश
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पंतप्रधान आवास योजना चऱ्होली या गृहप्रकल्पाला महानगरपालिकेकडून लावलेला चुकीचा मालमत्ता कर फेडरेशनच्या पाठपुराव्याने अखेर रद्द करण्यात आला आहे. चिखली-मोशी-चऱ्होली- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. (PCMC)
सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून कर संकलन विभागाचे प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्याकडे पंतप्रधान आवास योजना चऱ्होली या गृहप्रकल्पाला बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्याच्या अगोदरपासून म्हणजे २०२२ पासून कर आकारणी करण्यात आली होती. याची तक्रार फेडरेशनकडे आल्यानंतर फेडरेशनच्या माध्यमातून कर संकलन विभागाचे प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्याबरोबर बैठक झाली आणि चुकीची कर आकारणी २०२२ ऐवजी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्याच्या तारखेनंतर म्हणजे २०२३ पासून होईल, असे आश्वासन फेडरेशनच्या आणि पंतप्रधान आवास योजना चऱ्होली मधील नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी सागर चव्हाण, विजय ठोंबरे, स्वप्निल धोत्रे, ज्योती कारखेले, अर्चना गवई, अरुणा चव्हाण उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान आवास योजना चऱ्होली या गृह प्रकल्पात असणाऱ्या १ हजार ५०० सदनिकाधारकांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल फेडरेशनचे आभार व्यक्त केले आहेत. फेडरेशनच्या पाठपुराव्याला यश आल्यानंतर या योजनेतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
प्रतिक्रिया
पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींनी वेळेत कागदपत्र सादर न केल्यामुळे चावी वाटप केल्यापासून मिळकतकर लागू केला होता. मात्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतरच्या तारखेपासून मिळकतकर आकारणी करावी, अशी सदनिकाधारकांची मागणी होती. त्यानुसार हरकती होत्या. त्यावर सुनावणी करुन बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यापासून २०२३ पासून मिळकत कर आकारणी करण्यात येईल.
– नाना मोरे, प्रशासन अधिकारी, कर संकलन विभाग, महापालिका.
प्रतिक्रिया
पंतप्रधान आवास योजना चऱ्होली या योजनेमध्ये १ हजार ५०० सदनिकाधारक राहतात. या सदनिकाधारकांवर महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाने चुकीच्या पद्धतीने केलेली कर आकारणी रद्द करून सुधारित कर आकारणी करण्यात येईल असे आश्वासन कर संकलन आणि कर आकारणी विभागाचे प्रशासन अधिकारी नाना मोरे यांनी दिली. यामुळे सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.