दुकानदारांच्या कमिशनवाढीसह विविध समस्या मार्गी लावण्याबाबत केली आर्जव (PCMC)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठकीची मागणी…
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये भरघोस वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारने रेशन दुकानदारांना दिले होते. आता पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. सत्ताधारी महायुती सरकारने राज्यातील ५२ हजार रेशन दुकानांदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. कमिशन वाढीसाठी लढा देणाऱ्या दुकानदारांना दिलासा मिळावा, यासाठी ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स फेडरेशन पुणे, स्वस्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांची नुकतीच भेट घेतली. कमिशन वाढीसह विविध समस्या लवकर सुटाव्यात यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी निवेदनाद्वारे मागणी करीत त्यांना पदाधिकाऱ्यांनी साकडं घातलं आहे. (PCMC)

यावेळी संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता, पुणे अध्यक्ष गणेश डांगी, रमेश शर्मा, पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष अशोक पाटिल, शंकरराव अतकरे, शहाजी लोखंडे, चिंतामणी सोंडकर, नरेश अगरवाल, मोहनलाल चौधरी, विक्रम छाजेड, लाजपतराय मित्तल, राजुशेठ कर्नावट, गणेश कांबळे, अजय जाधव, धर्मपाल तंतरपाळे, ढोरे काका, नाना कड, ओंमकार भागवत, जयनाथ काटे, निवृति फुगे, दिलीप तापकीर, एकनाथ मंजाल यासह ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स फेडरेशन, स्वस्त भाव धान्य दुकानदार, केरोसीन परवानधारक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, ” महाराष्ट्रातील ५२ हजार रास्त भाव धान्य दुकानदार हे शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करतात. धान्य, आनंदाचा शिधा वाटप अशा शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासह आधार सिडिंग, ई-केवायसी, आयुष्मान कार्ड, मोबाईल सिडींग अशी विविध कामे विना मोबदला वेळेत करून देण्यातही दुकानदार मागे नाहीत. त्यामुळे रेशन दुकानदार हा शासनाचा महत्वपूर्ण भाग बनला आहे. परंतु, राज्य शासन नेहमीच या दुकानदारांच्या समस्यांचा गांभीर्यपणे विचार करीत नाही, असे आजवर आलेल्या अनुभवातून सिद्ध होत आहे. (PCMC)
२०१७ सालापासून रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल १५० रुपये इतके अत्यल्प कमिशन आहे. ते आजच्या महागाईच्या हिशोबाने अगदी तोकडे आहे. नव्याने कमिशन वाढ करून द्यावी, अशी आमची अनेक वर्षांपासून जुनी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण, पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक ठेकेदारांमार्फत वेळेत धान्य मिळत नाही. काही दुकानदारांना महिनाअखेरिस धान्य मिळाल्याने शेवटच्या दोन ते तीन दिवसात धान्य वाटप करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे बहुतांश कार्डधारक धान्यापासून वंचित राहत आहेत. उशिरा धान्य मिळणाऱ्या दुकानदारांना धान्य वाटपास मुदतवाढ मिळावी. अशा विविध मागण्या शासन दरबारी करूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कमिशन वाढीबाबत फक्त आश्वासन मिळत आहे, कृती होत नाही. त्यामुळे राज्यातील रेशन दुकानदारांवर अन्याय होत आहे.
आपण या प्रकरणाची दखल घ्यावी. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स फेडरेशन पुणे आणि स्वस्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कमिशन वाढीसह प्रमुख समस्यांवर बैठक घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे’.