Tuesday, November 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चिखली, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती परिसरातील समस्या दहा वर्ष 'जैसे...

PCMC : चिखली, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती परिसरातील समस्या दहा वर्ष ‘जैसे थे ‘- अजित गव्हाणे

रेडझोन, पाणी, रस्ते, विजेची समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार (PCMC)


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिखली, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती परिसरातील मूलभूत समस्या गेली दहा वर्ष ‘जैसे थे आहेत. रेड झोनची टांगती तलवार, अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, खड्डे पडलेले रस्ते आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अशा समस्यांनी नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. (PCMC)

हे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील असे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले.

चिखली, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, सोसायटी धारक तसेच उदयोजकांची भेट (दि 17)घेत अजित गव्हाणे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

गव्हाणे यावेळी म्हणाले चिखली, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती परिसरातील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर या भागातील मुख्य समस्या रस्त्यांची असल्याचे नागरिकांनी सांगितले.

लघुउद्योजक तर रस्ते आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे अतिशय त्रस्त आहेत.
चिखली, मोशी, तळवडे या परिसरात मोठ्या प्रमाणात लघु उद्योग आहेत. या कंपन्यांपर्यंत जाण्यासाठी चिखली, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रे वस्ती या भागाचा ये जा करण्यासाठी उपयोग करावा लागतो. (PCMC)

या भागात शहरातून अनेक जण कामानिमित्त येतात. या भागाला प्राधान्याने रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पुरवणे गरजेचे होते. मात्र गेल्या दहा वर्षात याकडे अतिशय मोठे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या भागात दररोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवते.

याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या मात्र याकडे दुलर्क्ष झालेच.शिवाय अद्यापही विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही. वीज यंत्रणा सक्षम करण्याबाबत ठोस उपाय योजना सत्ताधाऱ्यांनी केलेल्या नाहीत. गेल्या दहा वर्षात रेड झोन बाबत पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे कारवाईची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर कायम आहे. या सर्व गोष्टींना वैतागलेल्या नागरिकांनी परिवर्तन करण्याचे ठरवले आहे.

खोटं बोल पण रेटून बोल अशी मानसिकता येथील भाजप आमदारांची आहे. मात्र अशा भूलथापांना आता नागरिक बळी पडणार नाही. नागरिक परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत असून भोसरी मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.

अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका

संबंधित लेख

लोकप्रिय