Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : नाट्य क्षेत्रासाठी प्रवीण तुपे यांचे मोलाचे योगदान - प्रशांत दामले

PCMC : नाट्य क्षेत्रासाठी प्रवीण तुपे यांचे मोलाचे योगदान – प्रशांत दामले

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : ”कलाप्रेमी प्रवीण तुपे यांनी महापालिकेत अधिकारी असताना नाट्यगृहात काय हवे, काय नको, याबाबत कलाकारांची मते विचारात घेऊन प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची निर्मिती केली. त्यामुळे नाट्यगृह आजही सुस्थितीत आहे. (PCMC)

तुपे यांचा फोन आला की कोणत्याही कलाकारांकडून घेतला जात नाही, असे कधीच होत नाही. लगेच फोन स्वीकारला जातो. नाट्य क्षेत्रात तुपे यांना ओळखत नाही. अशी एकही व्यक्ती नाही. कलाकारांना सहकार्य करण्यात ते सदैव तत्पर असतात”, असे गौरोद्वगार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी काढले.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त, सायन्स पार्कचे संस्थापक, संचालक प्रवीण तुपे यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात दामले बोलत होते.

खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शिवसेनेच्या जिल्हासंघटिका सुलभा उबाळे, माजी महापौर नितीन काळजे, तुपे यांच्या सौभाग्यवती रजनी तुपे, महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता मनोज शेटीया, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी नगरसेवक अमित गावडे, अरुण बो-हाडे, पंडित गवळी, वसंत नाना लोंढे, संतोष कुदळे, सायन्स पार्कचे शैक्षणिक अधिकारी सुनील पोटे, सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे जवाहर कोटवानी, खगोल वैज्ञानिक डॉ. प्रकाश तुपे, संकेत तुपे आदी उपस्थित होते. (PCMC)

दरम्यान, महापालिकेच्या अभियंता सुरेखा कुलकर्णी यांनी प्रवीण तुपे यांच्यावर कविता सादर केली. त्यांच्या कार्याची ध्वनीफीत दाखविण्यात आली. सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता संजय कांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले. मानपत्र, पगडी देऊन तुपे यांचा सत्कार केला.

प्रशांत दामले म्हणाले, ”की माझी आणि प्रवीण तुपे यांची २२ वर्षांची मैत्री आहे. नाट्य परिषदेचा अध्यक्ष झाल्यापासून ब-याच वेळेला मंत्रालयात जाणे होते. त्यामुळे नाही कसे म्हणायचे हे अधिका-यांकडून मला शिकता आले. नाही कसे म्हणायचे हे तुपे यांना चांगले जमते. त्यामुळेच त्यांचे कोणी शत्रू नाही. मलाही त्यांनी एक-दोन वेळा नाही सांगितले आहे. शिक्षणाचा वेगळा पगडा त्यांच्यावर आहे. त्यामुळे बोलताना शब्द कोणता, कसा आणि कोणासमोर सूर कसा वापरायचा हे त्यांना जमते. त्यांनी उत्तम शिक्षणच घेतले नाही तर ते प्रत्यक्षात उतरवले. (PCMC)

चिंचवड येथील अत्याधुनिक प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह हे केवळ तुपे यांच्यामुळे उत्तम स्थितीत दिसत आहे. नाट्यगृहात काय हवे, काय नको, हे प्रत्यक्ष उभा राहून, कलाकारांना विचारुन त्यांनी दर्जेदार, टिकाऊ काम केले. नाट्यगृह गळत नाही. आसन व्यवस्था, साउंड यंत्रणा व्यवस्थित आहे. त्यांच्या संकल्पनेतून सायन्स पार्क तयार केले. परंतु, याची महाराष्ट्रात फारशी जाहिरात झाली नाही. लोकांनी यायला पाहिजे, बघायला पाहिजे. शासनाची मदत न घेता ही संस्था स्वत:च्या पायावर उभी आहे. हा प्रकल्प देशभरात पोहोचला पाहिजे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची” ग्वाहीही दामले यांनी दिली. (PCMC)

तसेच ”आकुर्डीतील गदिमा नाट्यगृहात सुधारणा करण्यासाठी तुपे यांनी प्रयत्न करण्याचे” आवाहनही केले.

आमदार गोरखे यांनी मनोगतात, ”प्रवीण तुपे हे चांगले अभियंता आहेत. त्यामुळे अभियंत्याला जोडणे आणि तोडणे चांगले जमते. त्यामुळे कोणतीही जोडतोड न करता त्यांनी काम केले. कधी काय केले पाहिजे हे त्यांना चांगले समजते. त्यांचा अनुभव शहराच्या विकासासाठी उपयोगी होईल”.

आमदार खापरे यांनी तुपे यांचे मार्गदर्शन घेऊन राजकीय वाटचाल सुरु केल्याचे सांगत पुण्यात सांस्कृतीक कार्यक्रम होतात. तर, पिंपरी चिंचवडमध्ये का नाही म्हणून तुपे यांनी स्वरसागर महोत्सव सुरू केला. त्यामुळे अनेक दिग्गज कलाकार शहरात येऊन गेले. महापालिकेने नकार दिल्यानंतरही स्वरसागर महोत्सव सुरू ठेवला. त्यांनी शहरवासीयांचा सांस्कृतीक भूक भागविली”. ‘प्रवीण तुपे यांच्या मनात काय आहे, हे भल्याभल्यांना कळले नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ते शांतपणे खुलासा करत असे. नातीगोती असूनही त्यांनी सर्वांसोबत चांगले संबंध जोपासले. पाण्यात राहून कोरडे राहिले’, असे उबाळे म्हणाल्या.

वैद्य म्हणाले, ”की पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरीत कला रुजविण्यासाठी तुपे यांनी प्रयत्न केले. शहराला सांस्कृतीक वारसा दिला. शहरातील सांस्कृतीक चळवळीची गरज तुपे यांनी भागविली”. तुपे यांनी राजकारणात यावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी केले. पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे जवाहर कोटवानी यांनीही मनोगत व्यक्त केले.

सांस्कृतीक शहर होण्यासाठी काम करण्याचा मानस –
प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाच्या नुतनीकरणाचे काम २०० कामगारांच्या मदतीने अवघ्या पाच महिन्यात पूर्ण केले. देशासाठी, शहरासाठी आपण काय केले या विचाराने काम केले. स्वरसागर महोत्सव सुरू केला. सागर हा आनंद देणारा असल्याने स्वरसागर हे नाव दिले. माणूस गुणदोशासह स्वीकारायचा असतो.

पुढील पिढीला विज्ञानाची माहिती व्हावी, विज्ञानाचा प्रसार व्हावा या भूमिकेतून सायन्स पार्कची निर्मिती केली. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून अतिशय जागतिक दर्जाचे तारांगण उभारले. गेली ११ वर्षे महापालिकेकडून एक रुपयाही मदत न घेता सायन्स पार्क, तारांगण चालविले जात आहे. परंतु, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे नेहमी सहकार्य असते. नागरिकांचा रोष पत्करुन पाणी मीटर बसविले. स्काडा प्रणालीचा अवलंब केला. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीएला सोबत घेऊन वाहतुकीची समस्या सोडविणे, नदी प्रदूषण मुक्त करणे आणि शहराची सांस्कृतीक नगरी अशी ओळख व्हावी यासाठी काम करण्याचा मानस असल्याचे तुपे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कातळे, आभार प्रतिमा चव्हाण यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय