पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकाराम महाराज जयंतीचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नवीन समर्थ विद्यालयात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ या संकल्पनेतून वृक्षदान व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच भंडारा डोंगरावरील झाडांना टँकरद्वारे पाणी घालून जीवनदान दिले. (PCMC)
मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा समितीचे अध्यक्ष महेश शहा, गोपाळे गुरुजी, प्राचार्या वासंती काळोखे, पर्यवेक्षक शरद जांभळे, मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी किशोर आटरगेकर, मालोजी भालके, बळीराम माळी यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात आवळा, जांभूळ, सीताफळ, चिकू, वड, पिंपळ, आंबा अशा विविध प्रकारच्या वृक्षरोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. (PCMC)
बळीराम माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान आहे. धरणीमातेने मुक्त हस्ते बहाल केलेला मौल्यवान खजिना म्हणजे वृक्ष आणि वेली जतन केले पाहिजे. माणसाने निसर्गाला विद्रूप करायचा जणू चंगच बांधला आहे. त्यामुळे एकेकाळी वैभवशाली असलेल्या निसर्गाला अवकळा येत चालली आहे. आज प्रमाणाबाहेर जंगलतोड होत आहे. प्रदूषण, अवर्षण, जमीनीची धूप या संकटांना आपणच आमंत्रण देत आहोत. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून जपले पाहिजे.
PCMC : मराठवाडा जनविकास संघातर्फे नवीन समर्थ विद्यालयात वृक्षारोपण
- Advertisement -