Sunday, February 23, 2025

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ९ हजार ६७५ कोटी २७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त शेखर सिंह यांनी केला सादर

नागरिकांचा सहभाग व हवामान अंदाजपत्रक ह्या दोन नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांचा समावेश (PCMC)

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आर्थिक वर्ष २०२५-२६ चे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीला शुक्रवारी (२१ फेब्रुवारी ) सादर केले. हा अर्थसंकल्प मूळ ६ हजार २५६ कोटी ३९ लाख रूपयांचा तर केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ९ हजार ६७५ कोटी २७ लाख रूपयांचा असून नागरिकांचा सहभाग व हवामान अंदाजपत्रक ह्या दोन नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह हा अर्थसंकल्प सादर करीत असल्याचे यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. (PCMC)

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रविणकुमार जैन, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, प्रभारी नगरसचिव मुकेश कोळप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, उप आयुक्त विठ्ठल जोशी, सचिन पवार, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त किशोर ननवरे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफ्फुल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, ‘सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे त्यांनी अंदाजपत्रकामध्ये घेतलेल्या सहभागाबाबत मनःपूर्वक आभार मानतो.

पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाकरिता २ हजार २७९ नागरिकांच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. नागरिकांच्या या सूचना शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. या सूचनांपैकी ७८६ सूचनांचा अंदाजपत्रकामध्ये समावेश करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प नागरिकांचा सहभाग व हवामान अंदाजपत्रक ह्या दोन नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह सादर केला जात आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५ हजार ८४१ कोटी (शिल्लकेसह) इतकी रक्कम जमा होईल, हे अपेक्षित धरुन सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मा. प्रशासक यांचे मा. स्थायी समिती मार्फत मा. महापालिका सभेपुढे सादर केले होते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६ हजार २५६ कोटी ३९ लाख (आरंभीच्या शिल्लकेसह) उत्पन्न अपेक्षित आहे व त्यात प्रत्यक्षात खर्च ६ हजार २५१ कोटी ३९ लाख होईल. यामध्ये मार्च २०२६ अखेर ५ कोटी इतकी शिल्लक राहील. अर्थसंकल्प हा मूळ ६ हजार २५६ कोटी ३९ लाख रूपयांचा तर केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ९ हजार ६७५ कोटी २७ लाख रूपयांचा आहे,’असेही त्यांनी स्पष्ट केले. (PCMC)

महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी अनुक्रमे १५ कोटी ६ लाख, ७ कोटी ९९ लाख, १८ लाख ९४ लाख, १८ कोटी ९७ लाख, १० कोटी ३५ लाख, २५ कोटी ९६ लाख, १० कोटी ६३ लाख, ३० कोटी २२ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. (PCMC)

मालमत्ता कर सुधारणा यावर भर देताना मालमत्ता कर वसुलीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच महापालिकेच्या विविध विभागांसाठी ड्रोन प्रतिमा वापरण्यात येत आहे. पायाभूत सुविधा आणि सेवांमध्ये सुधारणा करण्यावर आगामी वर्षात अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका सिटी सेंटर, अण्णासाहेब मगर स्टेडियम, संविधान भवन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था उत्कृष्टता केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नवीन प्रस्तावित मुख्य प्रशासकीय इमारत, डीपी रोड अशा विविध विकास कामांचा समावेश आहे. शहरी गतीशिलता अंतर्गत जंक्शन सुधारणा, हरित सेतू यावर लक्ष दिले जाईल. भामा आसखेड धरण पाणीपुरवठा प्रकल्प, पवना जलवाहिनी पाणी पुरवठा योजना, ड्रेनेज मास्टर प्लॅन, आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, विविध ठिकाणी अग्निशमन केंद्राची उभारणी, हवामान कृती आराखडा, एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी शुद्धकरून पुनर्वापर, जुन्या टाकलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग, मुळा-पवना-इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, सक्षमा प्रकल्प, लाईटहाऊस कौशल्यम्, प्रधानमंत्री आवास योजना, शाळेसाठी सीसीटीव्ही निरीक्षण प्रकल्प, विविध माध्यमांच्या प्रस्तावित शाळांचे नियोजन, तळवडे येथील जैवविविधता उद्यान, निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय विकसित करणे, छतांवरील एलईडी सोलार पॉवर जनरेशन सिस्टम्स, ईव्ही चार्जिंग सिस्टम्स, सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन आदी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

हवामान अंदाजपत्रक फ्रेमवर्क लाँच (PCMC)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपले हवामान अंदाजपत्रक फ्रेमवर्क लाँच केले आहे. पिंपरी चिंचवड शहर हे असा दृष्टिकोन स्वीकारणारे जागतिक स्तरावरील निवडक शहरांपैकी एक बनले आहे. हा उपक्रम आर्थिक नियोजनास दीर्घकालीन हवामान उद्दिष्टांसह अधोरेखित करणारा आहे. हवामान अर्थसंकल्प हे सुनिश्चित करतो की, वाटप केलेला प्रत्येक रुपया कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवामानातील लवचिकता मजबूत करण्यासाठी योगदान देईल. यामुळे पिंपरी चिंचवडला ओस्लो, लंडन, न्यूयॉर्क आणि मुंबई यांसारख्या जागतिक शहरांच्या पंक्तीत आणले जाईल. या शहरांनी वाढत्या हवामान संकटाचा सामना करण्यासाठी समान आराखडा स्वीकारला आहे. हवामान अंदाजपत्रक प्रशिक्षण कार्यशाळेसाठी स्थापत्य, पर्यावरण, जलनिस्सारण, उद्यान, विद्युत अशा एकूण ६ विभागांना प्राधान्य देण्यात आले. संपूर्ण पदानुक्रमातील एकूण ३२४ महापालिका अधिकाऱ्यांनी हवामान अंदाजपत्रक प्रशिक्षणात भाग घेतला आहे. (PCMC)

ग्रीन बॉण्ड काढणारी महाराष्ट्रातील पहिली महापालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका महसूल वाढीवर विशेष भर देत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २८ जुलै २०२३ रोजी म्युनिसिपल बॉण्डद्वारे २०० कोटी रुपये उभारले आहेत. बॉण्डमधून मिळणारी रक्कम पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत मुळा नदी प्रकल्पाच्या विकासासाठी वापरली जाणार आहे. आता हरित सेतू प्रकल्पांतर्गत रस्त्याचे जाळे विकसित करण्यासाठी गवळी माथा चौक ते इंद्रायणी नगर चौकापर्यंत टेल्को रस्ता बांधण्यासाठी ग्रीन बॉण्डद्वारे निधी उभारण्यात येणार आहे. ग्रीन बॉण्डद्वारे निधी उभारणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे, असेही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

ही आहेत अर्थसंकल्पाची खास वैशिष्ट्ये

– मनपाच्या विकासकामांसाठी र.रु. १९६२.७२ कोटी इतक्या रकमेची तरतूद केली आहे.

– स्थापत्य विशेष योजना या लेखाशिर्षातंर्गत र.रु. ७५३.५६ कोटी तरतूद प्रस्तावित आहे.

– शहरी गरीबांसाठी (BSUP) अंदाजपत्रक तरतूद र.रु. १८९८ कोटी.

– जेंडर बजेट- महिलांच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद र.रु. ८३ कोटी.

– दिव्यांग कल्याणकारी योजना तरतूद र.रु. ६२.०९ कोटी

– पाणी पुरवठा विषयक भांडवली विकास कामांकरिता र.रु. ३०० कोटी.

– पी.एम.पी.एम.एल करिता अंदाजपत्रकात र.रु. ४१७ कोटींची तरतूद.

– भूसंपादनाकरिता र.रु. १०० कोटी तरतूद.

– अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरिता र.रु. १० कोटी तरतूद

– स्मार्ट सिटीसाठी र.रु. ५० कोटी तरतूद

– अमृत २.० योजनेसाठी र.रु. ५५.४८ कोटी तरतूद.

अर्थसंकल्प २०२५-२६ साठी उद्दिष्ट्ये

– आर्थिक जबाबदारी आणि स्थिरता
– स्मार्ट प्रशासन आणि सार्वजनिक सेवा
– प्रगती शिक्षण आणि कौशल्य विकास
– श्वाश्वत आणि हवामानाला अनकूल शहरी विकास
– सामाजिक समता आणि समुदयाचे कल्याण

पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच शाश्वत प्रगती, पायाभूत सुविधा आणि विकासासाठी एक महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन ठेवून अर्थसंकल्पात त्याप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन राखण्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राधान्य असणार आहे.

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

- Advertisement -

Latest Articles