मुलींमध्ये एमआयटी, आळंदीचा प्रथम क्रमांक (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात पीसीसीओईने तर मुलींच्या गटात आळंदी येथील एमआयटी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला. (PCMC)
विजयी संघांना बुधवारी (दि.२५) पीसीईटीचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव बाजीराव पाटील व कै. श्रीमती लीलाताई शंकरराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ फिरता चषक पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, एसडीडब्ल्यू डॉ. पद्माकर देशमुख पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. ज्ञानेश्वर चिमटे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने
(पीसीसीओई) या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले होते.
पीसीसीओईचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांनी नियोजन केले होते. दि. २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान या आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन (मुले व मुली) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सदर स्पर्धेमध्ये मुले गटात पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी संघाने इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर सायन्स, ताथवडे संघाचा ३/२ अशा फरकाने पराभव करत अजिंक्यपद पटकावले. मुली गटामध्ये एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (आळंदी) संघाने विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (बारामती) संघाचा २/० फरकाने पराभव करत विजेतेपद पटकाविले. स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील ५५ महाविद्यालयाच्या मुले संघाने व २४ महाविद्यालयाच्या मुली संघांनी सहभाग घेतला होता.
मुलांच्या अंतिम सामन्यात पीसीसीओई, निगडी महाविद्यालयाचे यश साळुंखे, ओम शेळके, वेदांत देसाई व रितेश निहाल यांनी उत्कृष्ट खेळ करून विजेतेपद मिळविले.
दरम्यान सोमवारी (दि.२३) स्पर्धेचे उद्घाटन पीसीईटीच्या उपाध्यक्ष श्रीमती पद्मताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक नरेंद्र लांडगे, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र अवघडे, सचिव डॉ. उमेशराज पनेरू आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल मुले
विभाग विजयी :- पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (निगडी); उपविजयी :- इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर सायन्स (ताथवडे); तृतीय क्रमांक :- डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय (आकुर्डी) आणि मुली विभाग विजयी :- एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, (आळंदी); उपविजयी :- विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (बारामती); तृतीय क्रमांक :- पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय (रावेत).
यशस्वी संघांचे व स्पर्धकांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.