पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.२५ – भारतीय संविधान दिनानिमित्त दि.२६ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२४ याकालावधीत पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानावर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (PCMC)
भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे करण्यात आले आहे. दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येणारा आहे.
सकाळी १०.४५ वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी.११ वाजता भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी ११.१५ वाजता गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये गायिका सुमन चोपडे, गायक मारुती जकाते, बापू माने, अनिरुद्ध सूर्यवंशी, सुनील गायकवाड, निहाल लगाडे यांचा समावेश आहे. दुपारी १ वाजता संगीतकार मंगलसिंग सोळंके यांचा प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम “ स्वरधारा” होणार आहे. त्यानंतर दु.३ वाजता संविधान गीते,देशभक्ती आणि प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम “तुझ्या पाऊलखुणा” हा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक चेतन चोपडे आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत. (PCMC)
यानंतर सायंकाळच्या सत्रात ५ वाजता भारतीय संविधानाला अभिप्रेत समाजव्यवस्था या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रा. दिलीप महालिंगे (नाट्य लेखक, दिग्दर्शक, कलावंत), प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे (दलित साहित्याचे भाष्यकार), प्रा.डॉ. अर्चना जगतकर( समाजशास्त्र विभागप्रमुख, कोल्हापूर), के.अभिजित (“राईट टू लव” चळवळ कार्यकर्ते), मुकुल निकाळजे ( विद्यार्थी कार्यकर्ते), डॉ.मौलिक राज (शिकागो), अविनाश तायडे (गांधीनगर, गुजरात), प्रज्ञा जाधव (जे.एन.यु. दिल्ली) आदी वक्त्ते सहभाग घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता भारतीय संविधानाच्या मूल्यांना उजागर करणारा हिंदी-मराठी कविता व गीतांचा सांस्कृतिक जलसा निर्मिक आर्टस् अँड मिडिया सेंटर, मुंबई प्रस्तुत “रंग अमन के” हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दि.२७ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रबोधनपर गीतगायनाचा कार्यक्रम
सकाळच्या सत्रात गौतम बद्रीके, राहुल विघ्ने, रोशन तेलतुंबडे, पंढरीनाथ गाढे, प्रभाकर भगत, संगीता भंडारे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात १२ वा. प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम होणार असून यामध्ये विशाल ओव्हाळ, भारतबाबू लोणारे, स्वप्नील पवार, धीरज वानखेडे, शेखर गायकवाड आदी गायक आपली कला सादर करणार आहेत.
त्यानंतर दुपारी २ वाजता भारतीय संविधानावर आधारित प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार असून सुप्रसिद्ध गायक संकल्प गोळे आणि गायिका दीक्षा वाव्हळ हे कलाकार सहभागी होणार आहेत. दुपारी ३.३० वाजता सुरप्रीत अशोक प्रस्तुत भारतीय संविधानावर आधारित गझलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायं.५ .वाजता जयेंदू मातोश्री प्रॉडक्शन, पुणे प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम सन्मान संविधानाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (PCMC)
ख्यातनाम पार्श्वगायक चंद्रकांत शिंदे आणि पार्श्वगायिका गायत्री शेलार हे कलाकार सहभागी होणार आहेत. सायंकाळच्या सत्रात भारतीय संविधानावर आधारित प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचा “भारत का संविधान है” हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ख्यातनाम गायक कुणाल वराळे आणि सहकारी आपली कला सदर करणार आहेत.
नागरिकांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.