Tuesday, March 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC: ‘जल्लोष शिक्षणाचा पर्व – २’ या कार्यक्रमाचे २३ व २४ जानेवारी २०२४ रोजी आयोजन-अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१७ -‘जल्लोष शिक्षणाचा पर्व -२’ हा दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परांच्या समन्वयातून काम करावे, कार्यक्रमात उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांना कोणत्याही सोयीसुविधांची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी तसेच या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांचा तसेच खाजगी शाळांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आज दिल्या. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांचे यश साजरे करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जल्लोष शिक्षणाचा पर्व – २’ या कार्यक्रमाचे आयोजन २३ व २४ जानेवारी २०२४ रोजी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल येथे करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आढावा बैठक महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे पार पडली, त्यावेळी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील बोलत होते.

---Advertisement---


या बैठकीस उपआयुक्त मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी  शितल वाकडे, किरण मोरे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता कैलास दिवेकर, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, आकांशा फाऊंडेशनच्या जयश्री ओबेरॉय तसेच त्यांचे सहकारी आणि विविध महापालिका शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते.

‘जल्लोष शिक्षणाचा पर्व -२’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, पालकांसाठी योग्य त्या सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या कामकाज आणि नियोजनाबाबत अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला.


हा उपक्रम महापालिका शाळांमधील महत्वाचा घटक तसेच शिक्षणाचा उत्सव आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांच्या यशाचे आणि आकांक्षांचे साक्षीदार होण्याची ही संधी आहे. त्यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय राहण्यासाठी सर्वांनी जोमाने काम करावे, असेही जांभळे पाटील यावेळी म्हणाले.

‘जल्लोष शिक्षणाचा पर्व -२’ हा कार्यक्रम सर्व १२८ महापालिका शाळांमध्ये दोन महिने चाललेल्या शैक्षणिक उत्सवाचा समारोप असणार आहे, विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता तसेच शिक्षकांच्या नवकल्पना साजरा करणे हा यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमात शैक्षणिक उत्कृष्टता, शालेय संस्कृती, तंत्रज्ञान एकात्मता, पालक आणि समुदाय सहभाग तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यांसारख्या शिक्षणाच्या विविध पैलूंमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, नागरिक तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles