Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शहरातील कचरा वेचकांच्या पाल्यांना महापालिकेचे अर्थ सहाय्य मंजूर

PCMC : शहरातील कचरा वेचकांच्या पाल्यांना महापालिकेचे अर्थ सहाय्य मंजूर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील कचरावेचक व्यक्तींच्या पाल्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याच्या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. (PCMC)

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत राहत असलेले व कचरावेचकांचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांचे जीवनमान उंचविण्याच्या तसेच त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या वतीने शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याच्या योजनेस प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

योजनेचे स्वरुप

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकणाऱ्या कचरावेचकांच्या मुलांसाठी वार्षिक अर्थसहाय्य.

लाभाचे स्वरुप – इयत्ता १ ली ते ७ वी मध्ये शिकत असलेल्या कचरावेचक पालकांच्या पाल्यांना वार्षिक ४ हजार रुपये अर्थसहाय्य महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये वार्षिक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

अटी व शर्ती- अर्जदाराने अर्जासोबत महापालिका हद्दीमधील आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. महापालिका हद्दीमधील मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत (पालकांची ) या दोन्हींपैकी एक पुरावा जोडणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिकेची प्रत, सध्याच्या इयत्तेमध्ये प्रवेश घेतल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. कचरावेचक पालक नोंदणीकृत कचरावेचक संघटनेचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र देखील सोबत जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना ई.सी.एस.द्वारे देण्यात येणार असल्याने अर्जदाराने स्वतःचे अथवा पालकांच्या नावे बँक खाते असलेले अद्ययावत पासबुकची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजना किंवा इतर कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत शिष्यवृत्ती देणे यापैकी एकाच योजनेचा लाभ देय राहिल, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या कचरावेचकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी वार्षिक बक्षिस रक्कम देणे

योजनेचे स्वरुप –

इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील कचरावेचक पालकांच्या पाल्यास अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य् शिक्षण मंडळाच्या माध्यमिक (एस.एस.सी.) व उच्च माध्यमिक (एच.एस.सी.)परीक्षा उतीर्ण विद्यार्थ्यांना तसेच आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.सी.) आणि आय.सी.एस.सी अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील कचरावेचकांच्या मुलांसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

लाभाचे स्वरुप

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील इयत्ता १० वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. सी.बी.एस.सी. बोर्ड तसेच आय.सी.एस.सी. बोर्ड अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील इयत्ता १० वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत येणाऱ्या शाळांमधील इयत्ता १२ वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने १५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. सी.बी.एस.सी. बोर्ड तसेच आय.सी.एस.सी. बोर्ड अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील इयत्ता १२ वी मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना ७ हजार ५०० रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.

अटी व शर्ती

अर्जदाराने अर्जासोबत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. तसेच महानगरपालिका हद्दीमधील मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत (पालकांची ) या दोन्हींपैकी एक पुरावा जोडावा. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिकेची प्रत तसेच सध्याच्या इयत्ते मध्ये प्रवेश घेतल्याचे बोनाफाईड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. कचरावेचक पालक नोंदणीकृत कचरावेचक संघटनेचे सभासद असलेचे प्रमाणपत्र सोबत आवश्यक आहे. या योजनेचा लाभ हा ई.सी.एस. द्वारे देण्यात येणार असल्याने, अर्जदाराने स्वत. चे अथवा पालकांचे नावे बँक खाते असलेले अद्ययावत पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे. (PCMC)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतर कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत इ.१०वी व १२वी मधील ८० टक्के व ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेला एस.एस.सी. बोर्ड, एच.एस.सी. बोर्ड, आणि सी.बी.एस.सी. बोर्ड तसेच आय.सी.एस.सी. बोर्ड अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विदयार्थी व विदयार्थीनींना बक्षीस रक्कम देणे या योजनेचा किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील कचरावेचकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वार्षिक बक्षिस रक्कम देणे यापैकी एकाच योजनाचा लाभ देय राहिल याची नोंद घ्यावी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील कचरावेचकांच्या मुलांना मोफत सायकल देणे.

योजनेचे स्वरुप

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये ५०टक्के व त्यापेक्षा जास्त गुण संपादन करणा-या कचरावेचकांच्या मुलांसाठी मोफत सायकल उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. .

लाभाचे स्वरूप

कचरावेचकांच्या पाल्यांसाठी मोफत सायकल उपलब्ध करून देण्यासाठी इयत्ता ८ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांना ७ हजार रुपये अर्थसहाय्य महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे.

अटी व शर्ती

अर्जदाराने अर्जासोबत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. तसेच महानगरपालिका हद्दीमधील मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत (पालकांची ) या दोन्हींपैकी एक पुरावा जोडावा. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याबाबतची गुणपत्रिकेची प्रत तसेच सध्याच्या इयत्तेमध्ये प्रवेश घेतल्याचे बोनाफाईड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. कचरावेचक पालक नोंदणीकृत कचरावेचक संघटनेचे सभासद असलेचे प्रमाणपत्र सोबत आवश्यक आहे. या योजनेचा लाभ हा ई.सी.एस. द्वारे देण्यात येणार असल्याने, अर्जदाराने स्वत. चे अथवा पालकांचे नावे बैंक खाते असलेले अद्ययावत पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे. आपला अर्ज पात्र झाल्याचे या कार्यालयामार्फत कळविल्यानंतर सायकल खरेदी केल्याचा जी.एस.टी. क्रमांक असलेली पक्की पावती सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

अर्जदाराने सादर केलेल्या सायकल खरेदीच्या पावतीतील रक्कम आणि ७ हजार रुपये या पैकी जी रक्कम कमी असेल ती अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजना किंवा महिला व बालकल्याण योजना किंवा इतर कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत शिष्यवृत्ती देणे यापैकी एकाच योजनाचा लाभ देय राहिल.

बैठकीतील मंजूर विषय

महापालिका परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती अदा करणे, शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकणाच्या दृष्टीने सुशोभीकरणाची कामे करणे, भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील रस्त्याची स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, मनुष्यबळ तसेच यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेचे कामकाज करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आदी विषयांसह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

संबंधित लेख

लोकप्रिय