मोशी परिसराच्या विकासाला चालना म्हणून आमची साथ (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – मोशी येथील ६५० बेडचे हॉस्पिटल, न्यायालय संकुल, अभियांत्रिकी कॉलेज, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, संविधान भवन यांसारख्या अभिनव प्रकल्पांची उभारणी भोसरी मतदारसंघात करून आमदार महेश लांडगे यांनी मोशी सारख्या समाविष्ट गावांमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे. (PCMC)
विशेषतः पिंपरी चिंचवडच्या तुलनेत विकासाच्या प्रवाहात मागे पडलेल्या समाविष्ट गावांना विकासाचा अर्थ सांगणाऱ्या आमदार लांडगे यांच्या पाठीशी मोशी गाव एकजुटीने उभे राहणार आहे, असा निर्धार माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांनी व्यक्त केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मोशी येथील श्री नागेश्वर महाराज मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये नारळ वाढवून प्रचाराचा ‘श्री गणेशा’ करण्यात आला.
गाव दौऱ्यामध्ये प्रचाराच्या निमित्ताने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. फुलांची उधळण करत फटाक्याच्या आतिशबाजीत आणि रांगोळ्यांच्या पायघड्यांनी आमदार महेश लांडगे यांचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. मोशी गावठाण येथून प्रचाराला सुरुवात झाली. शिवाजीवाडी, हवालदारवस्ती, सस्ते वाडी, आल्हाटवाडी, लक्ष्मीनगर, कुदळे वस्ती, सस्ते वस्ती येथील नागरिकांचा भेटीगाठी घेण्यात आल्या. यावेळी आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. (PCMC)
आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून मोशी कचरा डेपो येेथे वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग, बायोगॅस निर्मिती, सीएन्डडी वेस्ट प्रकल्प कार्यान्वयीत करण्यात आला. बफर झोनची हद्दी कमी केली. त्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करता आल्या.
यासह आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, संविधान भवन, पिंपरी-चिंचवड न्यायालय संकूल, आयआयएम कॅम्पस आणि विशेष म्हणजे जगातील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ उभारण्यात येत आहे. त्यामुळे मोशी आणि परिसराचा लौकीक वाढला आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. (PCMC)
माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे म्हणाले की, 1997 मध्ये पिंपरी महापालिकेत मोशी आणि परिसरातील गावे समाविष्ट झाली. महापालिकेमध्ये गावे समाविष्ट होऊन देखील गावांना विकासापासून वंचित रहावे लागले. 2014 नंतर खऱ्या अर्थाने विकासाचा अर्थ या समाविष्ट गावांना समजला. हा अर्थ आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामातून मिळाला. आज सर्वाधिक मोठे विकास प्रकल्प भोसरी विधानसभेत आहेत.
ज्यामध्ये मोशी परिसराचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मोशी तसेच आजूबाजूच्या समाविष्ट झालेल्या परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक मोठे गृहप्रकल्प, ज्वेलर्स, ब्रँडेड कपडे व्यावसायिक मोशी परिसराला चांगला पर्याय म्हणून पहात आहेत. याचे सर्व श्रेय आमदार महेश लांडगे यांच्या दूरदृष्टीला जाते.
प्रतिक्रिया :
आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभेसाठी विविध विकास प्रकल्प या भागात आणले. सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार अतिशय चांगले काम करत आहे. लाडकी बहीण योजना महिला भगिनींसाठी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपले सरकार आणण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी आम्ही सर्व एकजुटीने उभे राहणार आहोत.
– प्रा. कविता आल्हाट, महिला शहराध्यक्षा, राष्ट्रवादी अजित पवार गट.
आमदारांच्या विजयासाठी नागेश्वर महाराजांचा भंडारा हाती
मोशी परिसरात आमदार महेश लांडगे यांचा प्रचाराचा प्रारंभ श्री नागेश्वर महाराज मंदिरामध्ये नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने भंडारा उधळण्यात आला. श्री नागेश्वर महाराजांच्या साक्षीने ग्रामस्थांनी आमदार महेश लांडगे यांच्या विजयाचा भंडारा हाती घेतला आहे. तसेच, मोशीतून सर्वाधिक मतदान लांडगे यांना होईल. यादृष्टीने आम्ही काम करीत आहोत, असा संकल्प स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला आहे.