महापालिकेच्या वतीने आयोजित रानजाई महोत्सवाचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते उद्घाटन (PCMC)
पिंपरी चिंचवड – नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपणाची जाणीव निर्माण व्हावी,शहरात पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने महापालिकेच्या वतीने २८ वर्षांपासून रानजाई महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. विशेषतः युवा पिढीने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. यामुळे त्यांना विविध वनस्पती, वृक्ष, फळे व फुलांची माहिती तर मिळेलच शिवाय जैवविविधतेचे महत्व कळेल आणि त्यांच्यामध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव देखील निर्माण होईल, भविष्यासाठी सक्षम पिढी घडवायची असेल तर त्यांचे नाते निसर्गाशी दृढ करणेही तितकेच आवश्यक आहे, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले. (PCMC)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने रानजाई महोत्सव’ व २८ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन नियोजित महापौर निवास निगडी प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात ७ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता मनोज सेठीया, बाबासाहेब गलबले, उप आयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसदस्या शर्मिला बाबर,सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, विजय जाधव, नितीन देशमुख,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उद्यान अधिक्षक योगेश वाळुंज, राजेश वसावे, माजी उद्यान संचालक दादाभाऊ पवार, उपलेखापाल अनिल कुऱ्हाडे, मुख्य लिपीक देवेंद्र मोरे तसेच महापालिका कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (PCMC)
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, निसर्गसौंदर्याने नटलेली फुलांची आकर्षक सजावट, कलात्मक आकृती मांडणी आणि हरित वातावरणाचा समृद्ध अनुभव रानजाई महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना मिळत असतो. नागरिक या महोत्सवाची उत्सुकतेने वाट पाहत असतात. महोत्सवाच्या माध्यमातून टेरेस गार्डन, घरगुती रोपसंवर्धन आणि लँडस्केप डिझाइन यांसारख्या स्पर्धा घेतल्या जातात, ज्यामुळे नागरिकांमध्ये वृक्ष संगोपनाची आवड निर्माण होते. वृक्षसंवर्धनाविषयी जनजागृती करणे आणि नागरिकांना प्रत्यक्ष कृतीसाठी प्रेरित करणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.निसर्गाच्या सान्निध्यात रोज वेळ घालवणे प्रत्येकाला शक्य नसते, पण आपल्या घरात, कार्यालयात किंवा परिसरात झाडे लावून आपण हिरवेगार वातावरण आपण तयार करू शकतो. रानजाई महोत्सव हा उद्देश सफल करत आहे. विशेषतः नवीन पिढीमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी, त्यांना जैवविविधतेचे महत्त्व कळावे, यासाठी गेली २८ वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. सर्व नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा आणि आपल्या कुटुंबासह या हरित सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले.
उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे म्हणाले, पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षांचे महत्त्व अमूल्य आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा मोठा भाग हिरवाईने नटलेला असून, शहराचे पर्यावरण संतुलीत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वृक्ष प्राधिकरण समिती करत असते. वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण आणि नागरिकांना हरित उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे, हे या समितीचे उद्दीष्ट आहे. महापालिकेने गेल्या २८ वर्षांपासून रानजाई महोत्सवाचे सातत्याने आयोजन करून हा उद्देश सफल करण्याचा प्रयत्न केला आहे. हा महोत्सव केवळ प्रदर्शन नसून एक प्रेरणादायी स्पर्धा आहे, जी नागरिकांमध्ये वृक्षलागवडीविषयी जागरूकता निर्माण करते. या माध्यमातून अधिकाधिक वृक्षारोपण होऊन शहर अधिक पर्यावरणपूरक बनण्यास मदत होत आहे. स्पर्धेमध्ये विविध शोभिवंत फुले, फळझाडे आणि रोपांची आकर्षक मांडणी केली जाते. या घटकांचे परीक्षकांमार्फत मूल्यमापन करून विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली जातात. सलग तीन दिवस चालणाऱ्या या हरित सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमाला पाठबळ द्यावे.
यावेळी महापालिकेच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी अभंग गायनाचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी तर उपस्थितांचे आभार उद्यान अधिक्षक योगेश वाळुंज यांनी मानले. (PCMC)
रानजाई महोत्सवात विविध फळे, फुले, रोपे आणि वृक्षांचे प्रदर्शन व स्पर्धा
रानजाई महोत्सवात विविध फळे, फुले, रोपे आणि वृक्षांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये विविध विभाग बनविण्यात आले आहेत. त्यामध्ये शोभिवंत कुंड्या, कलात्मक मांडणी, गुलाबपुष्प, हंगामी फुले, फळे, उत्तम भाज्यांचा संग्रह, निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्रे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू, बाग स्पर्धा, वृक्षसंवर्धन स्पर्धा आदी विभाग आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध गटातील स्पर्धांसाठी फिरता चषक
रानजाई महोत्सवात ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामध्ये शोभिवंत पाना फुलांच्या कुंड्यांच्या स्पर्धा, कारखानदार बाग स्पर्धा, खाजगी बंगल्याभोवतालच्या बाग स्पर्धा तसेच वृक्षारोपण स्पर्धांचे आयोजन केले जाते. या गटांमधील विजेत्यांना महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने फिरते चषक तसेच रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. ९ मार्च रोजी कार्यक्रमस्थळी बक्षिस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.