पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – छावा व्यापारी संघटनेचा निर्धार मेळावा संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या उपस्थितीत थेरगाव येथील सोनाई मंगल कार्यालयात आज पार पडला. (PCMC)
यावेळी धनाजी येळकर पाटील यांनी सांगितले की, चिखली कुदळवाडी भागातील भंगार व्यवसाय करणाऱ्या आणि छोट्या उद्योगांमधून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या हजारो आस्थापनांना वेळ आणि कोणतीही पर्यायी व्यवस्था न देता कारवाई करण्यात आली आहे, यामुळे हजारो व्यापारी,लघु उद्योजक आणि किमान एक लाख लोकांच्या रोजगारावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नांगर फिरवला आहे. महापालिका इतकी वेगवान आणि कठोर क्रूर कारवाई टॅक्स भरणाऱ्या लोकावर त्यांच्या आस्थापना आणि घरांवर करेल असे अपेक्षित नव्हते.
शहरातील रियल इस्टेटचा व्यवसाय करणारे आणि मोठ्या बिल्डर्सना आर्थिक लाभ मिळावा यासाठी संबंधित भागामध्ये बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी आतंकवादी राहतात. अशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक अफवा पसरवून लाखो लोकांचे संसार देशोधडीला लावण्याचे काम प्रशासनाने केले आहे, एवढ्यावरच न थांबता महापालिका प्रशासनाने शहरातील इतर भागांमध्ये सुद्धा असलेल्या स्क्रॅप आणि इतर व्यावसायिकांवर कारवाई करण्या संदर्भामध्ये नोटिसा काढल्या आहेत, यामुळे संपूर्ण शहरच उध्वस्त करण्याचा राक्षसी मनसुबा प्रशासनाचा आहे की काय, अशी शंका यायला रास्त जागा आहे. असे धनाजी येळकर पाटील म्हणाले. (PCMC)
या निमित्ताने आम्ही प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की या सर्व व्यावसायिकांना व कामगारांना उध्वस्त न करता पर्याय द्या अन्यथा जन आंदोलन उभारून रस्त्यावर उतरू असे येळकर पाटील म्हणाले” तर शहराच्या वैभवात वाढ घालणाऱ्या व शहराची संपत्ती वाढवणाऱ्या लाखो लोकांना जमीनदोस्त करण्याचे प्रशासनाचे व राज्यकर्त्यांचे स्वप्न आम्ही यशस्वी होऊन देणार नाही. त्यासाठी कुठल्याही पातळीवर लढा करण्यासाठी व्यावसायिकांनी तयार राहिले पाहिजे.
घराला स्मशान भूमीमध्ये बदलण्याचा प्रशासनाचा कुटील डाव कुठल्याही परिस्थितीमध्ये हाणून पाडायचा आहे. प्रशासनाने केलेल्या या कारवाईचा शहराच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर जो विपरीत परिणाम होणार आहे हे जाणीवपूर्वक प्रशासनाकडून दुर्लक्षित केले जात आहे. शहरात यामुळे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
गुन्हेगारी कृत्यांकडे तरुणांना नाईलाजाने वळविण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त करत आहेत. त्यामुळे आयुक्त साहेब, वेळीच भानावर या, कारवाई झालेल्या लोकांना नुकसान भरपाई देऊन सर्व प्रकारच्या परवानग्या सहजपणे उपलब्ध करून देऊन कायदेशीर मार्गाने व्यवसाय करण्याचा अधिकार या सर्व लोकांना द्या, राजकीय दबावाखाली येऊन विनाकारण सर्वसामान्य लोकांचे जीवन उध्वस्त करू नका, अन्यथा भविष्यात जो सामाजिक उद्रेक होऊ शकतो त्या परिणामांची जबाबदारी शहराचे प्रशासक म्हणून तुमच्यावरच येणार आहे. असा इशारा मानव कांबळे यांनी या मेळाव्यामध्ये दिला.
यावेळी माजी नगरसेवक मारुती भापकर, हाजी उस्मान शेख, जब्बार खान, इलियास शेख, छावाचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव, युवक अध्यक्ष आकाश हरकरे, उपाध्यक्ष राजन नायर, जिल्हाध्यक्ष महेंद्र शिंदे, उपाध्यक्ष विष्णू बिराजदार, विलास भोईने, संपर्क प्रमुख गणेश सरकटे, अमित मोरे, जिल्हाध्यक्षा निलम सांडभोर, शहराध्यक्षा निशा काळे, राजश्री शिरवळकर, अर्चना मेंगडे, दिनेश चौधरी, बेपारी शेख, राकेश यादव यांच्या सह बहुसंख्येने उद्योजक व्यापारी व कामगार उपस्थित होते.
PCMC : पर्याय द्या, अन्यथा अतिक्रमण कारवाई विरोधात रस्त्यावर उतरू – धनाजी येळकर पाटील
- Advertisement -