राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचा कामगार मेळावा उत्साहात संपन्न
तुतारी फुंकणारा माणूस चिन्ह प्रदर्शित करत आवाज घुमला
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.१४ – महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या कामगारांच्या हिताचे प्रश्न न सोडवता केवळ आश्वासनाची खैरात केली जाते व दोन पक्ष फोडण्याचे काम जरी केले असले तरी शरदचंद्र पवार यांच्यावरील विश्वास आणि दूरदृष्टी तसेच आणि महाविकास आघाडीने केलेले काम यामुळे पुण्यासह महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे मात्र आपल्याला अधिक जोमाने प्रयत्न करावे लागतील असे मत राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ खते यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्ष, नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाकडून थरमॅक्स चौक चिंचवड येथे भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
शिव,फुले,आंबेडकर,शाहू आण्णाभाऊ या महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून तुतारीच्या आवाजाच्या जल्लोषात मेळाव्याला सुरुवात झाली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातील असंघटित कामगार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश निमंत्रक नाना कसबे, सामाजिक कार्यकर्ते सचिन नागणे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर, ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, महासंघाचे कार्याध्यक्ष राजू बिराजदार, प्रवक्ते माधव पाटील, राजेश हरगुडे, सिद्धनाथ देशमुख, संतोष माळी, योगेश सोनवणे,विनोद गवई, आप्पा धोत्रे, युवराज निलवर्ण आदी उपस्थित होते.
राज्यात आणि देशात केवळ धार्मिक ध्रुवीकरण सुरू असून तरुणांच्या हाताला रोजगार नाही, महागाईमुळे महिलांचे बजेट कोलमडलेले आहे, जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी लावण्यात आलेली असल्यामुळे सामान्य नागरिक खूप त्रस्त असून या यातून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम महाविकास आघाडी करू शकते.
देशाचे नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच कामगार प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या मार्गदर्शनामध्ये राज्यात प्रचार सुरू करण्यात आलेला असून पुण्यातील शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती या लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार यशस्वी करण्यासाठी बैठकाचे सत्र सुरू झालेले आहे यात सहभाग वाढवण्याचे आवाहन करण्यात आले.
मेळाव्यानंतर विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीचा आढावा कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
प्रस्ताविक राजू बिराजदार यांनी तर आभार अनंत पाटील यांनी मांनले.