एसबीपीआयएम मध्ये महिला सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – सायबर गुन्हेगार हे बहुतांश वेळा सुशिक्षित लोकांना, मध्यम वयातील व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करतात. घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवणे, बक्षीस देणे, मोफत कर्ज देणे असे आमिष दाखवून फसवितात. बँकेतून, सरकारी कार्यालयातून, विद्युत विभाग किंवा एमएनजीएल येथून बोलत आहे असे सांगून बोलण्यामध्ये गुंतवून लिंक क्लिक करायला सांगितले जाते. मोबाईलवर ओटीपी किंवा सायबर फ्रॉड करणाऱ्या लिंक पाठवून माहिती विचारली जाते ही माहिती किंवा आलेला ओटीपी त्यांना देऊ नये. कोणत्याही लिंक वर क्लिक करून बक्षिसाच्या आमिषाला बळी पडू नये. आपले आर्थिक व्यवहार अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नये, नेहमी सतर्क रहावे. आपण सतर्क राहिलो तर स्वतःला व कुटुंबाला सायबर गुन्हेगारी पासून नक्की वाचवू शकतो असे पिंपरी पोलिस स्टेशनच्या सायबर विभाग पोलिस उपनिरीक्षक विद्या पाटील यांनी सांगितले. (PCMC)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पिंपरी चिंचवड मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. रुपाली कुदरे, विद्याथी विकास अधिकारी डॉ.काजल माहेश्वरी आदी उपस्थित होते. (PCMC)
वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी सांगितले की, शारीरिक तसेच मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने रोज नियमितपणे व्यायाम, प्राणायाम केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तणाव मुक्तीसाठी वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. सर्वांनी कुटुंबात संवाद साधून भावनिक वातावरण उत्तम राहील याची काळजी घेतली पाहिजे.
नियमित व्यायाम, संतुलित आहार, शक्य असेल तेव्हा पर्यटन आणि सकारात्मक विचार याचा आपल्या जीवनशैलीत वापर केला तर यश नक्की मिळेल असे डॉ. डांगे यांनी सांगितले.
संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी स्वागत केले. डॉ. रुपाली कुदरे यांनी आभार मानले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.