पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जिल्हास्तरीय शालेय ज्युनियर व सब ज्युनियर नेहरू कप हॉकी स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात झालेल्या सामन्यांमध्ये मोरवाडी येथील एसएनबीपी स्कूलने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली असून सेंट जुड हायस्कूल द्वितीय तर न्यू मिलेनियम हायस्कूलने तृतीय क्रमांक मिळवला. (pcmc)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि एसएनबीपी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय ज्युनियर व सब ज्युनियर नेहरू कप हॉकी स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन २६ ते २९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत चिखली येथील डॉ. दशरथ भोसले हॉकी पॉलीग्रास मैदान येथे करण्यात आले होते. गुरूवार २९ ऑगस्ट रोजी १७ वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोरवाडी येथील एसएनबीपी स्कूलने बाजी मारली. या स्पर्धेत ४० खाजगी, २ महापालिका अशा एकूण ४२ शाळांमधून ६७२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
यादरम्यान, क्रीडा दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हॉकी स्पर्धा सुरु असलेल्या ठिकाणी एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, एसएनबीपी स्कूलच्या मुख्याद्यापिका निना भल्ला, क्रीडा पर्यवेक्षक अनिल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी क्रिकेट प्रशिक्षक रवी सूर्यवंशी, इतर संघ व्यवस्थापक, खेळाडू आदी उपस्थित होते. यावेळी क्रीडा दिनाच्या निमित्ताने एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलचे ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर अक्षय मोहिते यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाची माहिती दिली. (pcmc)
२९ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय ज्युनियर व सब ज्युनियर नेहरू कप हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये सेंट जुड स्कूल विरुद्ध न्यू मिलेनियम स्कूल असा सामना रंगला. सुरूवातीच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. त्यानंतर पुन्हा या दोन्ही संघांमध्ये सामना खेळविला गेला. यावेळी सेंट जुड स्कूलच्या अनिशा कदम आणि ईश्वरी वाळूंज या खेळाडूंनी प्रत्येकी १ गोल केला आणि संघाला विजय मिळवून दिला.
अंतिम सामन्यात मोरवाडी येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध देहूरोड येथील सेंट जुड हायस्कूल या संघांमध्ये सामना रंगला. या सामन्यात एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलने ५ गोल करत दणदणीत विजय मिळविला. यामध्ये ऋतुजा पाटील हिने पहिल्या मिनिटाला १ गोल आणि अनुष्का बनसोडे हिने तिसऱ्या मिनिटाला १ गोल, माही दोशी हिने आठव्या मिनिटाला १ गोल, सई सकपाळ हिने दहाव्या मिनिटाला १ गोल आणि अर्णवी बेनके हिने तेराव्या मिनिटाला १ गोल करून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात विरोधी संघ सेंट जुड हायस्कूलला एकही गोल करता आला नाही.
या स्पर्धेसाठी आणि क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एसएनबीपी स्कूलचे फिजिकल डायरेक्टर फिरोज शेख तसेच क्रीडा शिक्षक मुकेश बिरांजे, घनश्याम कदम, सादिक शेख यांनी कष्ट घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसएनबीपी ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर अक्षय मोहिते यांनी केले. तर आभार अशोक शिंदे यांनी मानले.