अंत्योदय श्रमिक हॉकर्स महासंघाचा भोसरी येथे प्रथम वर्धापन दिन साजरा (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पिंपरी-चिंचवड शहरातील टपरी पथारी हातगाडी धारक फळभाजी विक्रेते यांच्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारने अनेक कायदे केले परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, तसेच एका बाजूला कायदे झालेले असताना देखील कायद्याचे अंमलबजावणी केली जात नाही. (PCMC)
यामुळे शहरातील या घटकांवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण कारवाई सुरू असून त्यांच्या वरती अन्याय अत्याचार होत आहे. अतिक्रमण कारवाई थांबण्यासाठी तसेच फेरीवाल्यांचे हक्क अधिकार प्रस्थापित करण्यासाठी व पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉकर्स झोन निर्मितीसाठी नवीन वर्षामध्ये कृतिशील कार्यक्रम राबवण्याचा निर्णय फेरीवाल्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
कामगार नेते हनुमंत लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली भोसरी येथे टपरी पथारी हातगाडी धारक प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आले होती.
यावेळी टपरी पथारी हातगाडी पंचायत महाराष्ट्र राज्य प्रमुख सल्लागारपदी कामगार नेते हनुमंत लांडगे यांची तसेच महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी दामोदर मांजरे यांची बहुमताने निवड करण्यात आली. (PCMC)
यावेळी टपरी पथारी हातगाडी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष दामोदर मांजरे, सरचिटणीस प्रकाश यशवंते, दत्तात्रय जाधव, शब्बीर इनामदार, सुरेश भुजबळ, लता कावभरे, केशरबाई जांभूळकर आदी यावेळी उपस्थित होते.
फेरीवाल्यांच्या हक्क अधिकारासाठी अंत्योदय श्रमिक हॉकर्स महासंघ याची स्थापना 1 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली होती त्यास एक वर्ष पूर्ण झाले असून या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले, 2005 साली तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व टपरीधारकांचे लायसन रद्द करून टपरी पथारी मुक्त पिंपरी चिंचवड शहर करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले, 2005 ते 2007 सलग तीन वर्षे आंदोलन केल्यानंतर 2007 साली “महानगरपालिका फेरीवाला धोरण 2007 हा देशातील पहिला कायदा करून घेण्यास आपल्याला यश मिळाले, यानंतर 2009 आली राज्य सरकार व 2011 साली केंद्र सरकार यांच्याकडे पाठपुरावा करून आपण केंद्र सरकारला व राज्य सरकारला देखील फेरीवाल्यांसाठी कायदा करण्यास भाग पाडले.
न्यायालय देखील आपण भूमिका मांडली सुरुवातीला उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण आपले भूमिका मांडली. आपल्या न्यायालयाने देखील आपल्या बाजूने निर्णय दिले, रस्त्यावरची लढाई विधान भवनातील लढाई तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर प्रदीर्घकाळ संघर्ष केल्यानंतरही टपरी पथारी हातगाडी धारकांना त्यांचे हक्क अधिकार प्राप्त झाले नाहीत.
सरकारने केलेले कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे केली जात नसून सातत्याने अतिक्रमण कारवाईमुळे त्यांच्या न्याय हक्क अधिकारावर गदा येत आहे, त्यांना अमानुषपणे वागवले जात आहे, अशा परिस्थितीमध्ये प्रस्थापित कायद्याच्या अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरणे व या कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करणे, यासाठी 2025 या वर्षी या प्रश्नावर धोरणात्मक कार्यक्रम राबवून या प्रश्नांवर काम करण्याचा संकल्प नवीन वर्षामध्ये सुरू केला असून 2025 या वर्षात हॉकर्स झोन निर्मितीसाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे आपल्या भाषणात बाबा कांबळे म्हणाले. (PCMC)
अध्यक्षीय भाषणात हनुमंत लांडगे म्हणाले, मी गेले काही अनेक वर्षापासून कामगार चळवळीमध्ये काम करत आहे. कामगार कष्टकरी यांची भूमिका घेऊन लढणाऱ्या संघटना कमी झाल्या असून ठेकेदार धार्जिणे धोरण राबवले जात आहे, मी सुरुवातीपासून फेरीवाल्यांचा संघर्ष अनुभवला आहे.
फेरीवाल्यांसाठी अनेक कायदे करून घेण्यास या संघटनेला यश आले असून बाबा कांबळे या कायद्याचे जनक आहेत. असे मला वाटते पुढील काळात माझ्या अनुभवाचा फायदा फेरीवाल्यांसाठी व्हावा, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी हनुमंत लांडगे म्हणाले.
दामोदर मांजरे म्हणाले, गेली अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करत असून माझं संपूर्ण जीवन मी फेरीवाल्यांच्या प्रश्नांसाठी व त्यांना न्याय हक्क अधिकार प्राप्त करून देण्यासाठी समर्पित केले आहे, या पुढील काळात देखील त्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहणार. असे दामोदर मांजरे म्हणाले.
यावेळी कष्टकरी श्रमिक फेरीवाले यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
टपरी पथारी हातगाडी पंचायत महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी दामोदर मांजरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख सल्लागारपदी हनुमंत अण्णा लांडगे यांचे नियुक्ती या वेळी करण्यात आल्याचे बाबा कांबळे यांनी जाहीर केले.