पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : नृत्यकला मंदिराचे कलाकार पुणे फेस्टिवल मध्ये नृत्यकलेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे, दि ९ सप्टेंबर रात्री साडेआठ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ह्या नृत्यनाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. (PCMC)
पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या महत्वाच्या संस्थांपैकी एक संस्था म्हणजे ‘नृत्यकलामंदिर.’ नृत्यकलामंदिरच्या संस्थापिका आणि संचालिका तेजश्री अडिगे ह्या स्वतः निष्णात भरतनाट्यम् आणि लोकनृत्य नर्तिका आहेत.नृत्यकला संस्थेतर्फे तेजश्री ‘भारत मेरा रंग रंगिला’ हे नृत्यनाट्य २००५ पासून सादर करित आहेत. भारतातील सर्व प्रमुख राज्यातील लोकनृत्य ह्या अतिशय सुंदर अश्या नृत्यनाट्यात सादर केली जातात.
नृत्यकलामंदिरच्या विद्यार्थ्यांबरोबरच पिंपरी चिंचवड भागातील कलाकारांनाही ह्या नृत्यनाट्याद्वारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. तसेच आत्तापर्यंत अनेक प्रथितयश कलाकारांनीही ह्या नृत्यनाट्यात आपली कला सादर केली आहे. ह्याचा पहिला प्रयोग २००५ च्या पिंपरी चिंचवड महोत्सवात झाला होता. (PCMC)
ह्याला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर अनेक महत्वाच्या महोत्सवात भारत मेरा रंग रंगीला चे सादरीकरण केले गेले. असाच एक मानाचा मुख्य सांस्कृतिक उत्सव आहे पुणे फेस्टिवल. यंदाच्या २०२४ च्या पुणे फेस्टिवलमध्ये नृत्यकलामंदिरला ‘भारत मेरा रंग रंगीला’ हे नृत्यनाट्य सादर करण्याची संधी मिळत आहे.
नृत्यकला मंदिरामुळे 50 कलाकारांना फेस्टिव्हाल मध्ये साधरीकरणाची संधी मिळाली आहे. तरी सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी अभिनेता मयुरेश पेम, नृत्य दिग्दर्शक विवेंद्र गुजराती, रुचिता जमादार,अश्विनी मुकादम, प्रतिभा इन्स्टिटयूटचे संचालक दीपक शहा, पुजा पवार आदी कलाकार उपस्थित राहणार आहे.
***