पीसीसीओईआर मधील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर याकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहू नये. नोकरीचा अनुभव घेऊन व्यवसाय उभा करून देशाच्या विकासात हातभार लावण्याचे उद्दिष्ट ठेवावे. (PCMC)
आजचा विद्यार्थी हा उद्याचा देशाचा एक सक्षम, जबाबदार, सुसंस्कृत नागरिक म्हणून सक्षमपणे उभा राहिला पाहिजे यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी संयुक्तपणे काम केले पाहिजे असे मार्गदर्शन करियर समुपदेशक अमोल निटवे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या रावेत तेथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) मधील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे पेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी निटवे बोलत होते.
यावेळी प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रा. शितलकुमार रवंदळे, प्रा. तुषार गायकवाड, प्रा. प्रिया बाळकृष्ण ओघे, प्रा. समीर सावरकर, माजी विद्यार्थी नीरज कुलकर्णी, प्रथम अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
निटवे यांनी सांगितले की, महाविद्यालयीन काळात पुस्तकी ज्ञान मिळवावे, तसेच मानवाच्या विकासाचा ध्यास असणारा, सामाजिक बांधिलकी जोपासणारा ‘माणूस’ प्रत्येकाने आपल्यात घडवावा. यातूनच देशाचा विकास होईल अशी अपेक्षा निटवे यांनी व्यक्त केली.
डॉ. प्रा. रवंदळे यांनी मागील वर्षांमध्ये पीसीईटी मधून शिक्षण घेऊन गेलेल्या आणि नोकरी व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्यांची आकडेवारी सादर केली. पीसीईटीच्या सर्वच शाखांमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी येतात. त्याची सविस्तर माहिती दिली.
प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी पीसीसीओईआर मध्ये देण्यात येणाऱ्या आधुनिक शिक्षण व संशोधनाबाबत माहिती दिली. यासाठी येथे उपलब्ध असणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील प्रथम वर्षाच्या ८ विद्यार्थ्यांनी दहा पैकी दहा एसजीपीए मिळवून प्रथम क्रमांक पटकावला होता, त्यांचा व व्दितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये पूर्वा भिरुड, विजयालक्ष्मी काटके, धीरज गव्हाणे, वैष्णवी पाटील, हेमश्री जावडेकर, मंगेश अलांगे, मधुरा पाटील आणि साजिका हडवळे आदींचा समावेश होता.
प्रा. गायकवाड व प्रा. सावरकर यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माजी विद्यार्थी नीरज कुलकर्णी याने मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी स्वागत आणि मैत्री भोईटे, अक्षय श्रीवास्तव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रिया बाळकृष्ण ओघे यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.