Sunday, May 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : आयुक्त शेखर सिंह यांनी बेकायदेशीररीत्या लादलेली टी.पी. स्कीम रद्द करून आयुक्तांची बदली करा : मराठा महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी चिंचवड – महापालिकेमध्ये मागील तीन वर्षांपेक्षाही अधिक काळ ठाण मांडून बसलेले आयुक्त शेखर सिंह यांची कार्यपद्धत ही अत्यंत चुकीची , अपारदर्शक असून शहरवासीयांच्या विश्वासाला तडा देणारी आहे. (PCMC)

मुळातच सन २०२२ पासून महापालिका सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नसल्याने पालिका सभागृहामध्ये प्रशासनाच्या चुकीच्या कामाबद्दल जाब विचारून , वचक राखणारे लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत, त्यामुळे प्रशासकीय निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे प्रशासन प्रमुख या नात्याने सर्वस्वी आयुक्तांकडेच एकवटलेले आहेत. अशावेळी व्यापक समाजहिताला प्राधान्य देत सर्वसामान्य शहरवासीयांचे जीवनमान उंचावणारी भरीव कामगिरी करण्याची नामी संधी उपलब्ध असताना देखील आयुक्तांनी आपल्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण शहरवासीयांचा भ्रमनिराश केलेला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कटिबद्ध जनहिताय ‘ या ब्रिद वाक्याला यथार्थ न्याय देण्याऐवजी आयुक्तांनी कायमच विशिष्ट सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या कळसूत्री बाहुल्याप्रमाणे काम करण्यातच धन्यता मानलेली आहे. (PCMC)

सत्ताधारी वरदहस्त लाभलेल्या विशिष्ट ठेकेदारांवर मोठी मेहेरनजर दाखवित हजारो करोडो रुपयांची अनेक अवाजवी , अनावश्यक विकासकामे जनतेच्या माथी मारून स्वतःची तुंबडी भरणाऱ्या बाजारू वृत्तीच्या ठेकेदारांचे अन् त्यांच्या राजकीय आकांचे खिसे भरण्याचे काम बिनदिक्कत करण्यातच आयुक्तांनी आपली संपूर्ण कारकिर्द खर्ची घातलेली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांत शहरातील लाखो करदात्यांनी पोटाला चिमटा काढून जमा केलेल्या करोडो रुपयांवर पाणी पडलेले असून महापालिकेचे आर्थिक नुकसान करण्याचे पातक आयुक्तांच्या हातून झालेले आहे. त्यामुळे टिपी प्लान रद्द करून आयुक्त शेखर सिंह यांची बदली करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच मागील आठवड्यात परदेशी दौऱ्यावर जाण्यापूर्वी महापालिका आयुक्तांनी स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा नागरिक यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. ८९६ नुसार सन १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या चिखली व चऱ्होली परिसरातील टी.पी. करण्याचा इरादा व्यक्त करणारे जाहीर प्रकटन स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीस दिले. मात्र त्याकरिता आवश्यक असणारी पारदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब केलेला नाही. (PCMC)

तसेच , प्रस्तावित इरादा व्यक्त करताना त्या भागातील तयार केलेल्या नकाशांवर आयुक्तांची सही होऊन संबंधित टी.पी. स्किमचा नकाशा हा महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करणे कायद्याने बंधनकारक होते. मात्र संबंधित नकाशावर आयुक्तांची सही झालेली नसतानाही महापालिका प्रशासनाने बेकादेशीररित्या परस्पर इरादा जाहीर करण्याचा प्रताप केलेला आहे. आयुक्तांची ही चुकीची कार्यपद्धत मनमानी अन् तुघलकी वृत्तीची द्योतक असून निषेधार्य आहे.

महापालिका प्रशासन प्रमुख या नात्याने आयुक्तांनी त्यांच्या तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत सर्वसाधारण सभेत घेतलेले विविध निर्णय, ठराव, बैठकांचे इतिवृत्त, जमा खर्चाचे तपशील इत्यादी कायद्यानुसार सार्वजनिक प्रकटनाद्वारे महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करून करदात्या शहरवासीयांपर्यंत पोहोचविणे बंधनकारक होते.

मात्र महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बेफिकीरवृत्तीने कार्य करण्याची ही मनमानी पद्धत महाराष्ट्र महापालिका कायद्यातील तरतुदींना हरताळ फासणारी असून शहरवासीयांची दिशाभूल व फसवणूक करणारी आहे. तसेच, लोकशाहीतील सर्वोच्च असलेल्या जनता जनार्दनाच्या विश्वासाहर्येतेला तडा देणारी आहे. (PCMC)

त्यामुळे भारतीय संविधानातील कायद्यासमोर सर्व समान या तत्वाला पायदळी तुडवून कर्तव्यात कुचराई करून महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या बेफिकीर वृत्तीच्या, अपारदर्शी, कुचकामी आयुक्तांपासून पिंपरी चिंचवड शहराच्या सामाजिक एकोप्याला व जातीय सलोख्याला धोका निर्माण झालेला आहे.

त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी चिखली , चऱ्होली या समाविष्ट गावांमध्ये बेकायदेशीररीत्या लादलेली टी.पी. स्कीम रद्द करावी. तसेच , चुकीच्या कार्यपद्धतीमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या कामचुकार, बेजबाबदार आयुक्तांची शासनाने तत्परतेने उचलबांगडी करून पिंपरी चिंचवड शहरास योग्य, कार्यक्षम व पारदर्शक कार्यपद्धती असणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी मराठा महासंघाचे शहराध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी केली आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles