पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – दि. २७ : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत चिखली पोलीस स्टेशन येथे सायंकाळी ७. ०० वाजता परिसरातील सोसायटी प्रतिनिधी यांची मीटिंग चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कोळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. (PCMC)
सदर उपक्रम हा परिसरातील गुन्हेगारी कमी होऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या वाढीसाठी अयोजित करण्यात आला होता.
चिखली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सोसायटीचे चेअरमन यांनी हजेरी लावली होती तर नागरिकांनी काय सतर्कता पाळावी, म्हणजे अनुचित घटना घडणारच नाही यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी मार्गदर्शन केले व या व्यतिरिक्त नागरिकांनी व्यवहार कसे करावेत यावर सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कोळी यांनी मार्गदर्शन केले. (PCMC)

बैठकीतील ठळक मुद्दे सर्व भागात राहणाऱ्या नागरिकांना जागृत करण्यासाठी सादर
१. परिसरात जर कोणतीही अनोळखी व्यक्ती रेंगाळताना दिसली तर त्या व्यक्तीची विचारपूस करने गरजेचे आहे.
२. घर भाड्याने देताना १००% संपूर्ण चौकशी करून रेंट अग्रिमेंट करने गरजेचे आहे.
३. आपली लहान मुले बाहेर खेळत असताना पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. किंवा त्यांच्या सोबत घरातील कोणीतरी असायला हवे.
४. आपल्या परिसरात CCTV उपाय योजना राबवावी. शक्य नसेल तर किमान आपल्या घरासाठी तरी CCTV योजना करावी.
५. परिसरातील बेवारस पार्किंग केलेल्या कार किंवा तत्सम वाहने असतील तर आणि त्यांचे मालक सापडत नसतील, तर तसा अर्ज वाहतूक विभागाला देऊन त्याची एक प्रत स्थानिक पोलीस चौकीला द्यावी. (PCMC)
६. सणासुदीला महिला भगिनींनी अवास्तव दाग दागिने परिधान करण्याचा मोह आवरणे गरजेचे आहे.
७. मोबाईल वर येणारे अनोळखी मेसेजला उत्तर देऊ नये किंवा कोणतीही apk फाईल आली तर ओपन करूच नये, फोन कॉल वर, इन्शुरन्स, क्रिपटो, जास्त व्याज देणाऱ्या कोणत्याही स्कीम, कमी पैशात एखादी वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळणे गरजेचे आहे. जास्त व्याज देणाऱ्या स्कीम मुळे आपला मेहनतीचा पैसा कधीही वाढत नाही. पैसे कमविण्यासाठी कष्ट करणे हाच एक पर्याय आहे.
८. वीज बिल, गॅस बिल भरले नाही म्हणून कोणतीही कंपनी तुमचे कनेकशन दोन तासात कट करत नाही. असे कॉल आले तर संबंधित बिलाची चौकशी अधिकृत कंपनीच्या संपर्क क्रमांकावर करावी. उगीचच घाबरून जाण्याची गरज नाही.
९. रस्त्यावर मध्यरात्री वाढदिवस साजरे करून परिसरात गोंधळ करताना कोण आढळल्यास त्वरित ११२ क्र. वर कॉल करून तक्रार करावी. योग्य ती कारवाई करण्यात येईल.
१०. सध्या १००० माणशी १ पोलीस अशी संख्या आहे त्यामुळे समाजातील सुजाण नागरिकांनी सामाजिक भान म्हणून कार्य करणे गरजेचे आहे.
११. कोणत्याही अनोळखी, किंवा विविध स्वस्त वस्तूंची खरेदी प्रलोभन दाखवणाऱ्या व्यक्तींवर महिला भगिनींनी विश्वास ठेवू नये. सदैव सतर्क राहावे. गुन्हेगाराला वय, धर्म, जात पात काहीही नसते. कोण कधी काय करेल याचीही कल्पना नसते.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके यांनी आपल्या भागातून या कार्यक्रमाला उपस्थित दर्शविली. गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी नागरिक हाच महत्वाचा भाग आहे म्हणून नागरिकांसाठी जनजागृती मोहीम येथून पुढे प्रत्येक सोसायटी मध्ये चिखली पोलीस राबविणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले. (PCMC)
परिसरातील नक्षत्र सोसायटी, मोरया अपार्टमेंट, ऐश्वर्यम हमारा, रिव्हर रेसिडेन्सी, घरकुल मधील अनेक सोसायटीच्या चेअरमन यांनी आपली उपस्थिती दर्शविली व नागरिकांना येणाऱ्या समस्या मांडल्या.
सदर बैठकीचे संपूर्ण नियोजन हे चिखली पोलीस स्टेशन येथील कर्मचारी वर्गाने अतिशय उत्तम रित्या केले होते. या मिटिंग साठी पोलीस निरीक्षक गुन्हे अमोल फडतरे, चिखली पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस फौजदार दिनेश ढवळे, महिला पोलीस हवालदार दीपमाला लोहकरे, सहाय्यक पोलीस फौजदार संभाजी कडलग उपस्थित होते.
अशा प्रकारचे जनजागृती मोहीमचे अनुकरण बाकी पोलीस स्टेशन यांनीही केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्वास सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी व्यक्त केला, तर आपण बाकी पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा संस्थेच्या वतीने मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.