Thursday, October 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महापालिकेच्या 'स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात नागरिकांनी ...

PCMC : महापालिकेच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे : आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहर स्वच्छ व सुंदर करण्याबरोबरच शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे शहराला भारतातील सर्वात सुंदर व स्वच्छ शहर बनविण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना शहरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असतो.

शहरातील नागरिक ओला आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून स्वच्छतेच्या उपक्रमात सहभाग घेत असतात, अशा शब्दांत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांचे प्रतीही कृतज्ञता व आभार व्यक्त केले आणि महापालिकेच्या ‘ स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात देखील शहरातील नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन केले. (PCMC)

महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ आज सकाळी ७ वाजता भोसरी येथील सी सर्कल, स्पाईन रोड या ठिकाणी पार पडला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सीताराम बहुरे, अजिंक्य येळे, किशोर ननावरे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ब्रँड अँम्बेसीडर पूजा शेलार, सुरेश डोळस, संगीता जोशी, अदिती निकम, यशवंत कन्हेरे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव प्रमोद राणे यांच्यासह सहायक आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (PCMC)

गतवर्षी स्वच्छतेच्या बाबतीत १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत आपला १० वा क्रमांक होता,आता आपल्याला स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचे शहर बनविण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले.

स्वच्छता ही प्राथमिक गरज असून ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे. पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी महापालिकेचे विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. तथापि, यासाठी शहरवासीयांची साथ आणि सहभाग महत्त्वाचा असून सर्वांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले.

“स्वच्छता ही सेवा” या उपक्रमाकडे स्वच्छतेची चळवळ समजून प्रशासन आणि शहरवासीयांनी एकजुटीने स्वच्छतेसाठी काम करणे आवश्यक आहे. शहरात साफसफाई करताना सफाई सेवक,सेविका घेत असलेल्या परिश्रमाबाबत त्यांच्याप्रती सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले. (PCMC)

स्वच्छतेची शपथ..

“आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक राहू आणि त्यासाठी वेळही देऊ,दरवर्षी १०० तास म्हणजेच प्रत्येक आठवडयातुन २ तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पाला पुर्ण करू, आम्ही स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही, सर्व प्रथम आम्ही स्वतःपासुन,आमच्या कुटुंबापासुन, आमच्या गल्ली-वस्तीपासुन, आमच्या गावापासुन तसेच आमच्या कार्यस्थळापासुन या कामास सुरवात करू,

आम्हाला हे मान्य आहे, कि जगामधील जे देश स्वच्छ आहेत त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरीक स्वतः घाण करीत नाही व घाण करून देत नाहीत या विचारांनी आम्ही गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करू,आम्ही आज जी शपथ घेत आहोत ती आणखी लोकांनाही घ्यायला लावू, तेही आमच्यासारखेच स्वच्छतेसाठी १०० तास देतील यासाठी आम्ही प्रयत्न करू,आम्हाला माहित आहे की, स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले आमचे पाऊल संपुर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल ” अशी संकल्पपूर्वक शपथ आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक व विद्यार्थ्यांनी घेतली, शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

आजच्या “स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता” या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हे होते.

आज झालेल्या कार्यक्रमात ब्रॅड अ‍ॅम्बेसिडर तसेच सफाई सेवक आणि सफाई सेविकांचा आयुक्त शेखर सिंह आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले. सूत्रसंचालन आर. जे. बंड्या यांनी केले तर आभार सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय