पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडूलकर – शहरातील वाढते तापमान तसेच प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने तळवडे येथे जैवविविधता उद्यान उभारण्यात येणार आहे. या उद्यानाच्या उभारणीसाठी नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात येत असून येत्या सात दिवसांत नागरिकांनी महापालिकेच्या तसेच स्मार्ट सिटीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि स्मार्ट सारथी अॅपवर अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.
शहरीकरण व नागरिकीकरणामुळे सरासरी तापमानात आणि प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनासाठी तसेच नागरिकांना जैवविविधता उद्यानाचे महत्व पटवून देण्यासाठी त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तळवडे जैवविविधता उद्यानाची संकल्पना साकारण्याचा मानस आहे.
नागरिकांच्या अधिक माहितीसाठी तळवडे जैवविविधता उद्यानाचे सादरीकरण महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच पीसीएमसी स्मार्ट सारथी ऍपवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. महापालिकेचे स्मार्ट सारथी ऍप एंन्ड्रॉइडमध्ये डाऊनलोड करण्यासाठी https://bit.ly/PCMCApp या लिंकवर तर आयओएसमध्ये डाऊनलोड करण्यासाठी https://bit.ly/PCMCSmartSarathiIOS या लिंकवर क्लिक करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.