Thursday, September 19, 2024
Homeताज्या बातम्याPCMC : तानाजी एकोंडे राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

PCMC : तानाजी एकोंडे राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी येथील आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यसंध्या-२०२४, या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील लेखक,कवी, पर्यावरण मित्र आणि वसुंधरा पर्यावरण प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष तानाजी एकोंडे-पाटील यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल “राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. (PCMC)

ज्येष्ठ साहित्यिक,कवी, डॉ.सुरेश वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात ३१ कवींनी आपल्या वैविध्यपूर्ण कवितेतून श्रावणसरीचे कवित्व गायले.त्यावेळी हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर,हभप अशोकमहाराज गोरे, शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक, जनार्दन गिलबिले, रमेश पाटील,कवी राजेंद्र सगर, शामराव सरकाळे, मनोजकुमार सूर्यवंशी, प्रकाश शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात रामराजे बेंबडे (सामाजिक), सुप्रिया मंडलिक (सेवाभावी संस्था), अर्चना साकुरे – उभे (भारती विद्यापीठ), कवयित्री सविता जंगम, लक्ष्मण सुतार (जादुगार), सोमनाथ शिनगारे यांनाही सन्मानित करण्यात आले. (PCMC)

तानाजी एकोंडे हे मागील चाळीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून पर्यावरणीय क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. विशेषता, वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे व पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती करणे ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

साहित्य क्षेत्रातही तानाजी एकोंडे यांचे कार्य उल्लेखनीय आहे.जपानमधील प्रशिक्षण काळात त्यांनी लिहिलेले “उगवत्या सूर्याचा देश-जपान” आणि “कर्मयोगी थरमॅक्समॅन आर डी आगा” या पुस्तकासह “स्वागत” काव्यसंग्रह आणि दोन संपादित पुस्तके त्यांच्या नावावर असून दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. (PCMC)

विविध क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय