पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – महापुरुषांचे महात्म व संतांचे संतत्व पूजनाची जबाबदारी ही आजच्या शिक्षकांची असावी, शिक्षक हा कोणत्या जाती, धर्माचा नसून तो सत्याचा आहे. प्रेमाचा धर्म हाच खरा धर्म आहे. साने गुरुजींचा आदर्श घेऊन गुणवत्तेचा आदर्श घ्यावा, यामधून समाजाला, देशाला न्याय मिळेल. आज शिक्षकांनी माणूस हा किती घडवला आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. (PCMC)
जातिवाद आणि धर्मवाद शिक्षकाना नसतो . आजच्या समाजाला चरित्र्य राहिलेनाही. त्यामुळे आज शिक्षणासोबतच समाजाला चरित्र व नीतीमूल्यांची गरज असल्याचे सांगत आयआयबी इन्स्टिट्यूट सरकारच्या समांतर काम करत आहे, म्हणूनच यामधून हजारो डॉक्टर इंजिनीयर घडत आहेत गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ॲड.महेश लोहारे यांचे कार्य तितकेच उल्लेखनीय आहे.असे गौरवोदगार अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी काढले.
पिं-चिं माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि आयआयबी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमशील शाळा, गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. सबनीस बोलत होते.
पिंपरी, चिंचवड व भोसरी परिसरातील सुमारे ९० हुन अधिक शाळा सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, पालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर , शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार ठोसर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, आयआयबी इन्स्टिट्यूटचे संचालक ऍड. महेश लोहारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी पडवळ, सचिव सुबोध गलांडे यांनी परिश्रम घेतले. संयोजन आयआयबी इन्स्टिट्यूटचे संचालक अॅड. महेश लोहारे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका गांधी यांनी केले. आभार प्रदर्शन संतोष काळे यांनी केले.