Thursday, January 23, 2025

पुरेसे वाहनतळ नसताना ‘पे अँड पार्क’ धोरण अव्यवहार्य, निर्णय त्वरित मागे घ्या – माकप

पिंपरी चिंचवड पुरेसे वाहनतळ नसताना ‘पे अँड पार्क’ धोरण अव्यवहार्य असून निर्णय त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

देशातील सर्वात जास्त दुचाकी, चारचाकी असलेले पिंपरी चिंचवड शहर आहे. येथील सार्वजनिक वाहतूक अपयशी ठरल्यामुळे घरोघरी नोकरदार, विद्यार्थी, महिलांनी वाहने कर्जे घेऊन वाहने घेतली आहेत. शहराच्या प्रत्येक प्रभागात बँका, मनपा, सरकारी कार्यालये, सिनेमागृहे, हॉटेल्स, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालये, दवाखाने, शोरूम राजकीय पक्षांची कार्यालये आहेत.

 

वेगाने विकसित होणाऱ्या या शहराच्या विकास आराखड्यामध्ये वाहन तळाची तरतूद होती. मात्र प्राधिकरण, मनपा, एमआयडीसी या प्रमुख सरकारी संस्थानी पार्किंगची समस्या भविष्य काळात नागरी समस्या होईल याचा गंभीरपणे विचार केला नाही. शहर विकास आराखड्यामध्ये असलेल्या वाहनतळाच्या जागा आज कोणत्या कारणासाठी वापरल्या जात आहेत, याची आयुक्तांनी चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शहराची सुमारे 27 लाख लोकसंख्या आहे. कामानिमित्त किती लाख वाहने रस्त्यावर येत आहेत. याचा कोणताही अभ्यास न करता फक्त 13 रस्त्यावर 450 ठिकाणी पार्किंग शुल्क लावून समस्या सुटणार नाही. रोड टॅक्स भरणाऱ्या प्रत्येकाला पार्किंग साठी मोफत जागा दिली पाहिजे. पार्किंग पॉलिसी मध्ये  फक्त कंत्राटदाराला पैसे मिळतील, भ्रष्टाचार होणार आहे. वाहतूक शाखेच्या वतीने गेली अनेक वर्षे रस्त्यावरील गाड्या ओढून नेण्याचे अर्थपूर्ण उद्योग सुरू आहेत. सामान्य नागरिक मूलतः बेशिस्त नसतो. मनपा आणि इतर शासकीय कार्यालयात पार्किंगची सुविधा नाही. शहरातील या परिस्थितीला लोकप्रतिनिधीसह शहर नियोजन अधिकारी जबाबदार आहेत. कामानिमित्त शहरात फिरणाऱ्या या सर्वांकडून पार्किंग शुल्क वसूल करून आर्थिक भुर्दंड बसवू नका, गंभीर तणावाचे प्रसंग निर्माण होतील, असेही म्हटले आहे.

 

पे अँड पार्कचे सध्याचे धोरण रद्द करावे, प्रभागाप्रमाणे नवे वाहनतळ निर्माण करावेत. शिस्तीच्या नावाखाली सामान्य नागरिकांचे खिसे मोकळे करणारे हे धोरण रद्द न केल्यास माकप आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे. माकपचे शहर सचिव गणेश दराडे यांनी काढलेल्या पत्रकावर गणेश दराडे, सतीश नायर, अमिन शेख, स्वप्निल जेवळे, सचिन देसाई, अपर्णा दराडे, शैलजा कडुलकर, शेहनाज शेख यांच्या सह्या आहेत.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles