Tuesday, March 18, 2025

बोधकथा: समस्या नाही असा “मनुष्य” नाही…! आणि “उपाय” नाही अशी समस्या नाही…!!

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

एका खेड्यात एक महाराज रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घेऊन घरी यायचे. यासाठी ते दोन बादल्या काठीला बांधून नेत असत. विहिरीवर दोन्ही बादल्या भरून ते घरी जायला निघे. माञ त्यातील डाव्या बाजूच्या बादलीच्या तळाशी एक बारीक छिद्र पडलेले असल्याने त्यातून थेंब थेंब पाणी गळायचे. महाराज घरी जाईपर्यंत त्या छिद्रवाल्या बादलीतून निम्मे पाणी वाटेत सांडून जायचे. 

असे रोज व्हायचे. एके दिवशी त्या गळक्या बादली कडे पाहून चांगलीवाली बादली म्हणाली, “बघ, मी किती महाराजांच्या उपयोगी पडते. पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते. नाहीतर तू पहा, निम्मे पाणी वाटेत सांडत येते”

हे ऐकून त्या छिद्रवाल्या बादलीला वाईट वाटते. दुसऱ्या दिवशी महाराज जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघाले , तेव्हा ती गळकी बादली महाराजांना म्हणते, “मी तुमची मेहनत वाया घालवते आहे. निम्मेच पाणी घरापर्यंत मी नेतेय. तर तुम्ही मला टाकून देऊन नवीन छान बादली का घेत नाही. ?”

यावर महाराज हसून सांगतात , “वेडी आहेस का ? तुला माहित नाहीये कि तू किती छान काम नकळत करते आहेस. नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला छान छान हिरवळ फुलली आहे. त्यात छान छान फुले देखील उगवली आहेत. ही डावी बाजू पहा किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे आता उजव्या बाजूला पहा. त्या बाजूच्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या साईडला कसलीही हिरवळ उगवलेली नाही. फुले तर नाहीच नाही !!

गेल्या अनेक महिन्या पासून मी देवपूजेसाठी जी फुले नेतोय ती याच डाव्या बाजूची आहेत. माझ्या या देव कार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस !! 

हे ऐकून ती गळकी बादली शहारली. मनापासून आनंदित झाली !!

? : दोष कोणात नाहीत ? सगळ्यात आहेत. त्यामुळे मी चांगला, तो वाईट, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातून जर कधी कोणाचे भले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने “अभिमानाने” मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक याला नावे ठेवतील. पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील !!

Related Articles

- Advertisement -

Latest Articles