Tuesday, April 16, 2024
Homeजिल्हाएसएफआयच्या राज्य अधिवेशनानिमित्त भिडेवाडा ते शिवनेरी शिक्षण ज्योत काढण्यात येणार

एसएफआयच्या राज्य अधिवेशनानिमित्त भिडेवाडा ते शिवनेरी शिक्षण ज्योत काढण्यात येणार

पुणे : महाराष्ट्र शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंदीचा निर्णय आणि भारतातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्याची झालेली दुर्दशा सुधारून त्याचे “राष्ट्रीय स्मारक” व्हावे या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या वतीने शिक्षण ज्योत काढण्यात येणार आहे.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे १८ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दि. १८ ते २० नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शिवनेरीच्या पायथ्याशी पार पडत आहे. याची जोरदार तयारी एसएफआयच्या वतीने करण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर दि. १७ नोव्हेंबर रोजी भिडेवाडा ते शिवनेरी अशी १०० किलोमीटर पायी, धावत शिक्षण ज्योत एसएफआयच्या वतीने शिक्षण ज्योत काढण्यात येणार आहे, अशी माहिती एसएफआय राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनी दिली.

एसएफआयने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, ज्या राज्यात ज्योतिबा आणि सावित्रीमाईंनी सर्व सामाजिक बंधने झुगारून मुलींच्या, समाजाच्या शिक्षणासाठी काम करत राहिल्या, त्यांनी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात 9 विद्यार्थिनींसह मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्याच राज्यात राज्य सरकार 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करत आहे. हे फारच गंभीर आहे आणि फुले, शाहु, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि समाजकार्याचा हा अपमानच आहे. या निर्णयाचा एसएफआय तीव्र विरोध करत असल्याचे म्हटले आहे.

भिडेवाड्या पासून निघणाऱ्या या शिक्षण ज्योतचे उदघाटन प्रसिद्ध विधीतज्ज्ञ असिम सरोदे करणार असून हि ज्योत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी येथे समाप्त होणार आहे. यासाठी साधारण पणे ५० ते ६० विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती एसएफआयचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय निर्मळ यांनी दिली.

ही शिक्षण ज्योत पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या मार्गाने शिक्षण ज्योत दापोडी येथे भारतीय स्वातंत्र चळवळीतील क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढचे प्रस्थान करणार आहे. त्यानंतर भोसरी, मोशी, चाकण मार्गे भारतीय क्रांतिकारक शहीद राजगुरू यांची जन्मभूमी असलेल्या राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा राजगुरू, सुखदेव, भगतसिंग यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुढे जाईल. त्यानंतर हुतात्मा बाबू गेनू यांची जन्मभूमी असणारा परिसर मंचर मार्गे शिक्षण ज्योत नारायणगावला पोहचेल. तेथून पुढे किल्ले शिवनेरी (छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ) जुन्नर या ठिकाणी “शिक्षण ज्योत” ची समाप्ती होईल असे एसएफआयचे जिल्हा समिती सदस्य अभिषेक शिंदे यांनी सांगितले. यावेळी एसएफआय राज्य समिती सदस्य पल्लवी बोराटकर, अभिषेक शिंदे, विलास साबळे उपस्थित होते.

Lic
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय