Sunday, December 8, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : १ मे च्या निमित्ताने... ८७ वर्षाच्या कॉम्रेड मदन...

विशेष लेख : १ मे च्या निमित्ताने… ८७ वर्षाच्या कॉम्रेड मदन नाईक यांच्या नजरेतून…

काल माझ्याकडे शिवसेनेचे संपर्कप्रमुख श्री विलास पारकर आले आणि चर्चा करता – करता त्यांनी १ मे आणि महाराष्ट्र दिनाचा विषय काढला. चर्चा जशी रंगत गेली तसे विलास सहज म्हणाला १ मे आणि महाराष्ट्र दिनाचे महत्व हे हळूहळू कमी होत चालेला आणि काही लोक हे पद्धतशीर पणे घडवत आहेत हे असेच चालू राहिले तर येणाऱ्या पिढीला संयुक्त महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास कळणार कसा ? म्हणून त्यांनी मला ह्या विषयी आपण लिहावे अशी गळ घातली. मी आज ८७ वर्षाचा आहे पण संयुक्त महाराष्ट्र म्हटले कि आजही माझ्या अंगात विशीच  उत्साह आणि त्वेष संचारतो. विलासचे म्हणणें मला पटले म्हणून मी लिहायचे ठरवले.

मी कोकणातून नोकरी निम्मित मुंबईत आलो आणि मुंबईतील गिरगाव परिसरात राहत असे. त्यावेळेस गिरगाव, परेल, लालबाग हि अगदी १००% कामगार वस्ती म्हणून ओळखली जात होती आणि  या सर्व विभागात कम्युनिस्टांचा प्रचंड प्रभाव होता. संध्याकाळी कम्युनिष्टांची कला पथके कामगारांसाठी नाटके / पथनाट्य यांचे प्रयोग करायचे आणि मुळातच नाटकाची आवड असल्यामुळॆ मी कम्युनिष्टांच्या कला पथकात काम करायला सुरवात केली. हळूहळू कामगार, मार्क्सवाद, साम्यवाद, समाजवाद, शेतकरी कामगार यांचे यांचे जागतिक संघर्ष, जागतिक साम्यवादी क्रांती ह्या सर्वांचा प्रवास सुरु असतानाच भारतामध्ये इंग्रजांची सत्ता जाऊन पंडित जवाहर नेहरूंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले होते. या मंत्री मंडळात वल्लभभाई पटेल, सी. डी. देशमुख, वी.क्रिष्ण मेनन, मोरारजी देसाई, गुलझारीलाल नंदा या सारखे दिग्गज नेते सामील होते आणि या मंत्रिमंळाने संपूर्ण देशामध्ये भाषावार प्रांत रचना करण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी महाराष्ट्र, गुजरात आणि मराठवड्याचा काही भाग हा मुंबई प्रांतामध्ये मोडत होता आणि मुंबई प्रांत हे द्विभाषिक राज्य होते. प्रामुख्याने मराठी आणि गुजराती बोलली जात होती. असे असले तरी मुंबईवर मात्र त्या काळी व्यापारी वर्गाचे वर्चस्व होते. व्यापारी वर्गात गुजराती समाज मोठ्या प्रमाणावर होता म्हणजे इतर समाजही होता पण गुजराती समाजाचा टक्का जास्त होता. त्यामुळे मुंबई प्रांतात मुख्यमंत्री जरी मराठी असला तरी इतर सर्व महत्वाची खाती हि व्यापारी वर्गाकडे असायची मोरारजी देसाई, जीवराज मेहता, शांतीलाल शहा हि अशी काही मंत्र्याची नावे. मराठी वर्ग हा प्रामुख्याने सूत गिरणी कामगार इतर कारखान्यामध्ये कामगार म्हणून विभागला गेला होता. 

जेव्हा भाषावार प्रांत रचनेनुसार गुजरात आणि महाराष्ट्र यांचे विभाजन करण्याचे ठरले, तेव्हा तेव्हा मुंबई कोणाकडे जाणार हा एक महत्वाचा प्रश्न होता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये व्यापारी वर्ग आणि कामगार वर्ग या दोघांचेही वर्चस्व होते. व्यापारी वर्गाला मुंबई महाराष्ट्रात जाऊ नये तर ती केन्द्रशासीत असावी असे वाटत होते. तर मुंबईतील कामगार वर्ग आणि महाराष्ट्रातील इतर जनतेला मुंबई महाराष्ट्रातच रहावी असे वाटत होते.

व्यापारी वर्गाचे नेतृत्व त्यावेळचे काँग्रेसचे पुढारी स.का.पाटिल करत होते तर संयुक्त महाराष्ट्राच्या समितीचे नेतृत्व आचार्य नरेन्द्र देव, सेनापती बापट, आचार्य अत्रे, एस.एम.जोशी, प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड श्रीपाद डांगे, कॉम्रेड प्रल्हाद कुरणे, शेकापचे प्रभाकर पाटिल, कोकणातील नाथ पै अशी दिग्गज मंडळी करत होती. 

संयुक्त महाराष्ट्र या चळवळीचे वैशिष्ट्य असे की सबध चळवळ भाषावाद, प्रांतवाद, धर्मवाद, जातीयवाद या पासुन अलिप्त होती. दोन्ही बाजुला सर्व प्रांतातील, धर्मातील, भाषेतील लोक होते. ही लढाई प्रामुख्याने मुंबई कुणाची ? मुंबई भांडवलदारांची कि मुंबई कामगारांची, मुंबई धन-धाडग्यांची कि मुंबई सर्व सामान्यांची, मुंबई व्यापायऱ्याची की  मुंबई  कष्टकऱ्यांची ह्या करिता होती.

हया लढाईमध्ये अनेक लोककलाकार देखील सामील होउ लागले कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे धारधार शब्दाचे गीत आणि कॉम्रेड शाहीर अमर शेख यांचा  पहाडी आवाज….

“संयुक्त महाराष्ट्र उगवतो माझ्या सरकारा,

आणि खुशाल कोबडे झाकुन धरा.”

या गीताने दिल्लीचे रस्ते सुद्धा दुम दुमु लागले. सेनापती बापट, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम.जोशी, कॉम्रेड डांगे यांच्या सभाना प्रचंड गर्दी होत असे, लोक सात-आठ किलोमीटर चालत सभाना येत असत. लोकानी त्यावेळी डांगेना धर्म, अत्रेना भीम तर एस.एम.जोशीना अर्जुनाची उपमा दिली होती. गिरगाव, दादर, परेल, लालबाग हा ९०% कामगार वस्तीचा भाग म्हणून ओळखला जात होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सुरवातीला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता. त्यातच मुंबईमध्ये नेहरूंची एक सभा होती आणि या सभेत काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने काही झाले तरी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे जाहीर केले. या सभेतून निघालेल्या महाराष्ट्रातील तरुण वर्गाने जर काही झाले तरी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नसेल तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे अशी प्रति घोषणा दिली आणि हा हा म्हणता संयुक्त महाराष्ट्रासाठी उभा महाराष्ट्र पेटून उठला. सेनापती बापट, लालजी पेंडसे, अत्रे, डांगे, प्रबोधनकार, एस. एम. जोशी हे सर्व नेते त्या वेळच्या जनतेचे दैवते होती.

काय होत्या मागण्या त्या समितीच्या तर, 

१. समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र झाला पाहिजे .

२. महाराष्ट्राच्या मातीत जे सरकार निवडून येईल त्याने महाराष्ट्राची संस्कृती वृद्धोगत करण्यासाठी योग्य ती पावले उचलली पाहिजेत.

३. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे.

४. केवळ मुंबईतच नव्हे तर सबंध महाराष्ट्रात इतर  भाषियांचा सन्मान करून मराठी माणसाला मनाने जगता आले पाहिजे, ही ती चार उद्दीष्टे होती.

मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून सबंध महाराष्ट्र एकवटला आणि १०५ आंदोलकांच्या बलिदानाने मुंबई महाराष्ट्राला मिळाली. 

मी हे तळमळीने लिहितो कारण या चळवळीत मी सक्रिय होतो आणि पोलिसांनी मारलेल्या खुणा या वयातही माझ्या शरीरावर मी अभिमानाने मिरवतो. 

पण या चळवळीचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून मी आज जेव्हा “सिंहावलोकन” करतो तेंव्हा मला काय दिसते. प्रसार माध्यमांचे एक लाडके वाक्य आहे “मुंबई महाराष्ट्रत आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही.”

मला आठवते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा सुरू होती, तेंव्हा चळवळीची भूमिका फक्त एक वर्तमान पत्र मांडत होते. त्याचे नाव होते नव-शक्ती आणि एक दिवस नव-शक्तीमध्ये एक मथळा आला “महाराष्ट्राच्या राम शास्त्र्याची लोकसभेत सिंहगर्जना” सबंध लोकसभेत पंडीत जवाहरलाल नेहरूंना “तुम्ही महाराष्ट्र द्वेष्टे आहात”, असे सांगून ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, असे स्वतंत्र भारताचे दुसरे अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पाहिले गव्हर्नर श्री. सी. डी. देशमुख, हे ज्या शाळेतुन शिकले ते गिरगांवचे आर्यन हायस्कूल बंद होण्याच्या मार्गावर आहे. रघुनाथ माशेलकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे ज्या शाळेतून शिकले ते गिरगांवचे युनियन हायस्कूल याचीही अवस्था काही वर्षांपूर्वी बिकट होती. भारताचा पहिला बोलपट आलम आरा मुंबईच्या ज्या मॅजिस्टिक सिनेमात प्रदर्शित झाला त्या ठिकाणी आता मॅजिस्टिक मॉल आला आहे. गिरण्यांच्या जागी टोलेजंग इमारती आणि मुंबईतून कामगार हद्दपार झाला आहे. 

मुंबईचे महत्व पद्धतशीरपणे कमी करण्याचे राजकारण गेले सात-आठ वर्षात वाढीला लागल्याचे दिसते. आणि याच कटाचा एक भाग म्हणून अहमदाबाद मधील व्यापाऱ्यांना मुंबईमध्ये जलद येता यावे म्हणून बुलेट ट्रेन आणि मुंबईच्या आजूबाजूला असलेले कारखाने पद्धतशीरपणे गुजरात व इतर ठिकाणी हलविण्याचे कट कारस्थान वेगाने चालु आहे. १ मे महाराष्ट्रदिन सोहळा म्हणून साजरा करताना मी पाहिले आहे. पण गेली सात-आठ वर्षे १ मे म्हणजे केवळ हुतात्मा चौकात फुले वाहण्या इतपतच महत्वाचा आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. त्या वेळेची आमची दैवते अत्रे, डांगे, एस. एम., प्रबोधनकार यांची साधी आठवणही कोणी करताना दिसत नाही. ही चळवळ आणि त्याचा इतिहास लोकांच्या मनातून पुसण्याचे काम सध्या जोरात सुरु आहे.

मुंबईतील आंदोलनेही संपली, केवळ राजकीय नाही तर सामाजिक विषयावरही (महागाई) अनेक आंदोलने मुंबईने पाहिली, अनेक चळवळी पाहिल्या पण मुंबईतील कारखाने हद्दपार झाले आणि त्याच बरोबर कामगार आणि कष्टकरी वर्गही मुंबईतून हद्दपार झाला. पर्यायाने मुंबईतील मराठी माणसाचा टक्काही घसरला आणि मुंबईतील चळवळी व आंदोलनेही संपली. मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिसेसही हळूहळू अहमदाबादला जातील.

१०५ हुतात्म्यांच्या रक्ताने, कष्टकऱ्यांच्या रक्ताने मिळवलेली मुंबई आज पुन्हा भांडवलदारी वर्गाच्या घशात जातेय, ही खंत मला स्वस्थ बसु देत नाही, म्हणून हा अट्टाहास…

कॉम्रेड मदन नाईक

संबंधित लेख

लोकप्रिय