Saturday, April 20, 2024
Homeराजकारणअमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या वडीलांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या वडीलांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा या अडचणीत आल्या आहेत. नवनीत राणा त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या विरोधात बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे, न्यायालयाने दुसऱ्यांदा हे वॉरंट काढले आहे.

नवनीत राणा यांनी शाळा सोडल्याचा खोटा दाखला देत जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप आहे. राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी 6 सप्टेंबरच्या न्यायालयीन सुनावणी राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या हजेरीतून सूट देण्याच्या अर्जास परवानगी दिली होती. मात्र 22 सप्टेंबरच्या सुनावणीसही दोघे पुन्हा गैरहजर राहिले. राणा यांच्या वकिलांनी कोर्टाकडे हजेरीतून सूट आणि आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगितीसाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने दोन्ही अर्ज फेटाळत दोघांविरोधात पुन्हा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे दोघांना पुढच्या सुनावणीला पुन्हा न्यायालयात हजर राहावं लागले अथवा सत्र न्यायालयात दाद मागावी लागेल. दरम्यान राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र या प्रकरणामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई हायकोर्टाने 8 जून 2021 रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द केलं आहे. या सोबतच त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हायकोर्टाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत कौर राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय