नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ( एनटीए ) जेईई – एनईईटी परीक्षा सुरक्षित बनविण्यासाठी आणि उमेदवारांची भिती कमी करण्यासाठी मंगळवारी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्याअंतर्गत परीक्षा केंद्रे वाढविण्यात आली आहेत.
यामुळे एक शिफ्ट आणि वर्गातील उमेदवारांची संख्या कमी होईल. जेईई मेन्स ही संगणक आधारित चाचणी आहे, तर नीट लेखी आहे. त्याचबरोबर एनटीए आणि शिक्षण मंत्रालयानेही स्पष्ट केले की, सप्टेंबरमध्ये त्यांच्या निर्धारित वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहेत . जेईई अँँडमिट कार्ड दिली गेली आहेत आणि विद्यार्थ्यांनी डाउनलोड देखील केली आहे. नीट ॲडमिट कार्ड लवकरच जाहीर केले जाईल श. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गोंधळामध्ये राहू नये. एनटीएने ९९ % विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पहिल्या प्राथमिकतेचे परीक्षा केंद्र सुनिश्चित केले आहे. जेईई मेनसाठी ८.५८ लाख आणि नीटसाठी १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
जेईई आणि नीट संदर्भातील जारी केलेली मार्गदर्शकतत्त्व –
◆ नीट परीक्षेदरम्यान २४ ऐवजी १२ उमेदवार वर्गात बसतील. नीट परीक्षा केंद्रे २५४६ वरुन ३८४३ करण्यात आली आहेत .
◆ जेईई परीक्षेची शिफ्ट ८ वरून १२ व परीक्षा केंद्रे ५७० वरून ६६० करण्यात आली आहेत.
◆ जेईईमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक जागा सोडून बसविण्यात येईल. जेईईच्या एका शिफ्टमध्ये एक लाख ३२ हजार ऐवजी ८५ हजार उमेदवार बसतील. उमेदवारांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखून ठेवले जाईल.
◆ ज्या विद्यार्थ्यांचे शरीराचे तापमान ९९.४ डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त आहे, त्यांना आयसोलेशन रूममध्ये नेले जाईल. तेथे बसून ते परीक्षा देतील.
◆ फ्रिस्किंग, कागदपत्रांची पडताळणी नोंदणी कक्षात केली जाईल. परीक्षा केंद्रात उमेदवारांना नवीन मास्क देण्यात येईल. परीक्षा केंद्रात प्रवेश पत्र, आयडी प्रूफ, फक्त पाण्याची बाटली, हँड सॅनिटायझर यांना परवानगी देण्यात येणार आहे.
NTA ने राज्यांना व्यवस्था करण्यास सांगितले असून एनटीएने सर्व राज्य सरकारांना उमेदवारांना परीक्षा केंद्रात पोहोचण्यास मदत करण्यास सांगितले आहे.