नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी संविधानावर चर्चा करतांना काँग्रेसला संविधानाची मुस्कटदाबी करणारा पक्ष असे म्हटले. त्यांनी १ तास ४९ मिनिटांच्या भाषणात सांगितले की, काँग्रेसच्या साठ वर्षाच्या राजवटीत ७५ वेळा संविधानात बदल करण्यात आले. (Narendra Modi)
मोदींनी सांगितले, “काँग्रेसने आणीबाणी लादून संविधानिक व्यवस्था समाप्त करून देशाचा तुरुंग बनवला होता, जनतेचे लोकशाही अधिकार नष्ट केले होते. वृत्तपत्र माध्यम स्वातंत्र्य यावर बंदी घालून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली होती.
त्यांनी साठ वर्षाच्या राजवटीत ७५ वेळा संविधानात बदल केले आहेत, आर्टिकल ३५६ चा गैरवापर करून राज्यसरकारे बरखास्त केलेली आहेत, संघराज्य पद्धतीचे अनेकवेळा उलंघन केलेले आहे. त्या काळातील पाप आणि कलंक काँग्रेसच्या माथ्यावर आजही आहे, तो कधीही धुऊन जाणारा नाही. (Narendra Modi)
जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा तेव्हा या कलंकाची चर्चा होईल. ज्यांनी आणीबाणी लादली, त्यांना आपल्या संविधानावर प्रेम असल्याचा दावा करण्याचा अधिकार नाही अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शनिवारी (१४ डिसेंबर) लोकसभेत संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चेदरम्यान भारताच्या संविधानाचे महत्व सांगितले.
ते म्हणाले की, आपला देश वेगाने विकास करीत आहे. जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने मजबूत पाऊल ठेवत आहे. भारताची एकता महत्त्वाची आहे. आपलं संविधानही भारताच्या एकतेचा आधार आहे. संविधानाच्या निर्मितीत देशातील मोठे दिग्गज, स्वातंत्र्यवीर, सामाजिक कार्यकर्ते, अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समाजातील प्रत्येक वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे होते.