Wednesday, January 22, 2025

नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील लोकांना गतिमान, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

मोदी@9 महा जनसंपर्क अभियान सुरू

शिरूर मधून महेश लांडगे, मावळ मधून बाळा भेगडे लोकसभेचे उमेदवार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर
: दि.०७ – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने 30 मे ते 30 जून दरम्यान लोकसभा मतदारसंघात मोदी@9 महा जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. या निमित्ताने कासारवाडी येथे पत्रकार परिषदेमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती विशेष जनसंपर्क अभियान प्रमुख व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकारांना दिली. पिंपरी चिंचवड, मावळ, शिरूर लोकसभा मतदार संघात जेष्ठ नागरिक, बुद्धिजीवी, महिला व विविध समाजघटकांपर्यंत भाजप कार्यकर्ते जनसंवाद साधणार आहेत.

एकूण 54 विकास योजना राबवून तळागाळातील शेतमजूर, शेतकरी, युवक युवतींच्या आकांक्षा मोदी सरकारने पूर्ण केल्या आहेत. फसल विमा, कौशल्य विकास, सुकन्या समृद्धी, मुद्रा लोन,अटल पेन्शन, ग्रामीण-शहरी आवास, ग्रामीण पेयजल ईई द्वारे शेतमजूर, शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी, युवा, महिला, आदिवासी सह विविध वंचित घटकांना आर्थिक सक्षम करण्यात आले आहे.जगातील सर्वात मोठी कोरोना काळातील लसीकरण योजना, शहरी व ग्रामीण पंतप्रधान आवास योजनेची 25 लाख स्वस्त घरकुले व इतर लाभार्थी यांची आकडेवारी बाळा भेगडे यांनी सादर केली.



महेश लांडगे शिरूर मधून लढणार

शिरूर लोकसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये मी लढण्यासाठी इच्छुक होतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत लोकसभा लढण्यासाठी व निवडून येण्यासाठी इच्छुक आहे,असे आमदार महेश लांडगे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. पिंपरी चिंचवड शहरात विविध विकासकामे भाजपच्या सत्ताकाळात जोमाने सुरू झाली आहेत,महाविकास आघाडीचा काळ वगळताकेंद्रात व राज्यात सत्ता आहे, त्यामुळे शहरवासीयांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू, असे महेश लांडगे म्हणाले.

पवना बंदिस्त जलवाहिनी व रेड झोनवर तोडगा काढू

मविआ सरकार व राष्ट्रवादीच्या मंडळींनी पवना बंदिस्त जलवाहिनीचा विषय चुकीच्या पद्धतीने हाताळला. शहराला पाणी देण्यास मावळवासीयांचा विरोध नाही. पिंपरी चिंचवड व्यतिरिक्त सोमाटणे, गहूंजे, तळेगाव, देहूरोड सह मावळ भागात वेगाने नागरिकीकरण होत आहे. शहरातील नागरिकांना माणशी 140 लिटर व ग्रामीण साठी माणशी 40 लिटर पाणी पुरवठा करण्यासाठी समन्यायी पाणी पुरवठा धोरण राबवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सातत्याने चर्चा होत आहे, रेड झोनचा प्रश्न सोडवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. असे बाळा भेगडे यांनी सांगितले.



इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, नोटबंदीसारख्या मुद्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे ते देऊ शकले नाहीत. पत्रकार परिषदेला आमदार अश्‍विनी जगताप, आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, माई ढोरे, नामदेव ढाके, अमोल थोरात, मोरेश्‍वर शेडगे, वर्षा डहाळे आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles