Sunday, December 8, 2024
Homeजिल्हानांदेड : कष्टकरी महिलांना अपमानजनक वागणूक देणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी

नांदेड : कष्टकरी महिलांना अपमानजनक वागणूक देणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी

नांदेड : नांदेड येथील रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकरी महिलांना अपमानजनक वागणूक दिल्याचा आरोप माकप कडून करण्यात आला असून  वजिराबाद पोलिस ठाण्यातील पोलिसावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नांदेड कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

नेमके काय घडलं ?

सीटू संलग्न बांधकाम कामगार संघटनेच्या आंबुलगा ता. मुखेड येथील सभासद असलेल्या महिला नाव नोंदणी तसेच नुतनीकरण आदी कामाकरीता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात चार मार्च रोजी एस. टी ने आल्या होत्या. स्थानिक समितीच्या  रेणुका संभाजी तुटेवाड यांच्यासह इतर पाच महिला एका महिलेची वाट पाहत बस स्थानकात थांबल्या होत्या. यावेळी वजिराबाद पोलिस ठाण्याच्या काही पोलिसांनी चोरीच्या संशयावरून या महिलांना ताब्यात घेत पडताळणी करायची आहे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली त्याच बरोबर न केलेला गुन्हा कबुल करा म्हणत दडपण आणण्याचा प्रयत्न केला त्याच बरोबर या महिलावर हात देखील  पोलिस कर्मचाऱ्यांकडून उगारण्यात आला  असल्याचा आरोप शेतमजूर युनियनच्या नेत्या मंजुश्री कबाडे यांनी “महाराष्ट्र जन्मभूमी”शी बोलताना केला.

महिलांनी शेतमजूर युनियनच्या नेत्या मंजुश्री कबाडे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता या महिलांच्या मदतीसाठी त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी आमच्या महिलांना विनाकारण बेकायदेशीर रित्या का आणले असा जाब विचारला असता त्यांनाही पोलिस कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली असल्याचे देखील  त्या म्हणाल्या. 

याबाबत “महाराष्ट्र जनभुमी”ने नांदेडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता चौकशीचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

कठोर कारवाईची मागणी :

दुर्बल महिलांना अपमानित करून न केलेल्या गुन्ह्यांमध्ये गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबन करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

कॉ. विजय गाभणे, उज्ज्वला पडलवार, कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. विनोद गोविंदवार, कॉ. बालाजी कलेटवाड, कॉ. अंकुश आंबुलगेकर, कॉ. माधव देशरवाड आदींनी लेखी निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन नांदेड पोलीस अधीक्षक सह गृहमंत्री व पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहे.

कामगार मजूर महिलांना पोलीसांनी अशा प्रकारची वागणूक देणे म्हणजे लोकशाहीला धोका निर्माण झाल्यासारखे असून या प्रकरणात गृहमंत्री व पोलीस महासंचालकांनी लक्ष घालून योग्य कारवाई करावी जेणे करून कायद्याचा दुरूपयोग करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक बसेल आणि लोकशाहीवरील विश्वास भक्कम होईल.

– कॉ. गंगाधर गायकवाड 

सेक्रेटरी – मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, नांदेड

आपण नेहमी जिथे राहतो तिथे आपल्याच संपर्कातल्या महिलांचा पोलिसांकडून असा छळ होणं हे खुपच त्रासदायक होत. स्त्रियांना कुटुंब किंवा समाजात जर काही त्रास होत असेल तर त्या पोलीस यंत्रणेची मदत घेऊ शकतील का? असा प्रश्न मला पडला. चित्रपटांमध्ये पोलिसांचं जे रूप बघितलं होत तेच त्यादिवशी मी अनुभवलं असे भयंकर प्रकार कसे हाताळावेत हा प्रश्न आपल्यासमोर आहेच. हे आव्हान चळवळ आणि नागरी संस्था कशा पेलणार ते ठरवावं लागेल.

– कॉम्रेड मंजुश्री कबाडे 

(शेतमजूर युनियनच्या नेत्या) 

यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मॉब लाँचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. जमावाकडून संशयित चोर ठरवून एखाद्या अनोळखी व्यक्तीला चोर म्हणून  जमावकडून मारहाण केल्याची प्रकरणे घडली आहेत यामध्ये कित्येकांचे निष्पाप बळी देखील गेली आहेत. पण जर पोलिसांकडूनच शहानिशा न करता जर एखाद्याला संशयित म्हणून अपमानास्पद वागणूक जात असेल तर ही मात्र गंभीर बाब आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय