श्रीरामांच्या भव्य मंदिरात येत्या 22 जानेवारीला रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. मंदिर लोकार्पणाचा हा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य असा असणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जगभरातील हजारो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत.या कार्यक्रमाला 6 हजार व्हीआयपींची उपस्थिती असणार आहे. जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना या मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण असणार आहे. राम मंदिराचं लोकार्पणाच्या दिवसाची इतिहासात नोंद होणार आहे. अतिशय ऐतिहासिक असा हा क्षण असणार आहे. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमामुळे देशभरातील कोट्यवधी रामभक्तांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. रामभक्तांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आनंद व्यक्त केला जातोय. रामभक्तांकडून अशाचप्रकारे आनंद व्यक्त करतानाचा एक शाळेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित व्हिडीओ हा नागपूर येथील शाळेतला आहे. या व्हिडीओत एक शिक्षिका आणि विद्यार्थी राम भजनावर नृत्य करताना दिसत आहेत. शाळेचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थींनी शाळेच्या हॉलमध्ये उभे आहेत. त्यांच्यासमोर एक शिक्षिका राम भजनावर नाचत आहे. तर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी देखील आपल्या शिक्षिकेचे डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहेत. शिक्षिकेने श्रीरामांच्या भजनावर अतिशय छान नृत्य केलं आहे. संपूर्ण शाळा या रामभजनात आणि नृत्यात तल्लीन झालेलं दिसत आहे.
या व्हिडीओला एएनआय वृत्त संस्थेच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडीओला 21 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी पाहिलं आहे. या व्हिडीओवर नेटीझन्सकडून वेगवेगळ्या कमेंट करण्यात येत आहेत. हार्दिक भावसर नावाच्या व्यक्तीने या व्हिडीओ प्रतिक्रिया दिली आहे. “आता तर संपूर्ण वातावरण राममय झालं आहे. प्रत्येक शाळा आणि डान्स क्लासमध्ये राम भजनच सुरु आहे”, अशी कमेंट त्यांनी दिली आहे.