Saturday, October 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसंगीतकार सलील कुलकर्णी यांना 'स्वरसम्राज्ञी आशा भोसले पुरस्कार' जाहीर

संगीतकार सलील कुलकर्णी यांना ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले पुरस्कार’ जाहीर

पिंपरी येथे नाट्यपरिषदेत बोलताना भाऊसाहेब भोईर व इतर

पिंपरी चिंचवड : पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, यावेळी नाट्यपरिषदेचे कार्यकारिणी सदस्य किरण येवलेकर, नरेंद्र आमले, सुदाम परब, राहुल भोईर, संतोष शिंदे, गौरी लोंढे, रुपाली पाथरे आदी उपस्थित होते.

यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, प्रसिद्ध गायिका गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २००२ पासून ‘स्वरसम्राज्ञी आशा भोसले पुरस्कार’ दिला जातो. गेल्यावर्षी कोरोनामुळे पुरस्कार वितरण सोहळा झाला नाही. २०२० चा पुरस्कार कोरोनाचे नियम पाळून लवकरच घेण्याचे नियोजन आहे. एकोणीसावा पुरस्कार डॉ. सलील कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. या वर्षीचा हा १९ वा पुरस्कार असून पुरस्काराचे स्वरुप १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह असे आहे.

डॉ. गिरीश प्रभुणे व मावशी रविंद्र यांचा होणार नागरी सत्कार – भाऊसाहेब भोईर 

या नियोजित कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात वैभवात भर घालणारे डॉ. गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि संगीत क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्र यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. अशीही माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली. या पुरस्काराचे यंदाचे एकोणीसावे वर्ष असून हा पुरस्कार यापुर्वी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन व सोनू निगम, सुनिधी चौव्हाण, पार्श्वगायक पद्मभूषण उदित नारायण, सुप्रसिध्द गायक रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते यांना प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. सलील कुलकर्णी यांच्याविषयी माहिती देताना भोईर म्हणाले, ‘‘वयाच्या तिसऱ्या वर्षी पुणे आकाशवाणीवर ‘‘जयोस्तुते श्री महन्मंगले…’ हे गीत सादर करून गायनास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी मुंबई दूरदर्शनवर संवादिनीवादन आणि गायन केले. त्यानंतर त्यांनी शास्त्रीय गायन पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे तर नाट्यसंगीताचे शिक्षण जयमालाबाई शिलेदार यांच्याकडून घेतले तर हार्मोनियम धडे प्रमोद मराठे यांच्याकडून घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्णवेळ कलेच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. संगीतकार म्हणून १९९६ पासून कार्यरत आहेत. तरीही वसंत फुलतो, आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे पंधराशेहून अधिक प्रयोग सादर केले आहेत. 

डॉ. सलील कुलकर्णी यांची पुणे आकाशवाणीवर ‘जयोस्तुते श्री महन्मंगले…’ हे गीत सादर करून गायनास सुरूवात 

तसेच पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह अभिजात कवितांच्या गाण्यांची व कवितेच्या रसास्वादाची मैत्र जीवांचे ही मैफल लोकप्रिय होत आहे. तसेच माझे जगणे होते गाणे, अग्गोबाई ढग्गोबाई, बाकीबाब आणि मी असे विविध कार्यक्रम सादर केले आहेत. तरीही वसंत फुलतो, स्वरभाव, आयुष्यावर बोलू काही, नामंजूर, सांग सख्या रे, संधिप्रकाशातक्षण मोहरते, दमलेल्या बाबाची कहाणी, डिबाडी डिपांग, भारतरत्न लतादीदी मंगेशकर ह्यांच्याबरोबर क्षण अमृताचे असे अल्बम लोकप्रिय ठरले आहेत. तसेच ‘स्वप्नांत पाहिली राणीची बाग, एकदा काय झाले, आता खेळा नाचा’ हे बालगीते लोकप्रिय ठरली आहेत.

तसेच विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, शांता शेळके ह्यांच्या बालकवितांची गाणी अग्गोबाई ढग्गोबाई भाग १ आणि २ – कवी संदीप खरे ह्यांच्याबरोबर बालगीते सादर केली आहेत. तसेच अभंग, रागामाला ही सादर केल्या आहेत. तसेच हे गजवदन – मराठी संगीतातील ९० गायकांना, वादकांना घेऊन गणपतीची नांदी आणि आरती सादर केली आहे. तसेच विठ्ठल विठ्ठल पांढर, चकवा, जन गण मन, चिंटू १ अँड २, मंकी बात, बायोस्कोप, निशाणी डावा अंगठा, आनंदी आनंद, हाय काय नाय काय, बदाम राणी गुलाम चोर, चॅम्पियन, मात या चित्रपटांनासंगीत दिले आहे. तसेच वेडिंग चा शिनेमा चे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तसेच एकदा काय झालं , हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ‘‘लपवलेल्या काचा आणि शहाण्या माणसांची फॅक्टरी ही दोन पुस्तके लोकप्रिय आहेत.’ प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्काराची निवड केली आहे.

तसेच यासोबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आयोजित २३ वी ‘ कै. राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा ‘ यंदा ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे होणार आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय