मुंबई : आशा व गटप्रवर्तक संघटनांनी आज (दि.२४) देशव्यापी संपाची हाक दिली होती. त्याला मुंबई जिल्हा आशा गटप्रवर्तक युनियनने सकारात्मक प्रतिसाद देत, संप यशस्वी केला.
आज सिटूने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत देशव्यापी संपाची हाक दिली होती. मुंबई शहरातील आशा या देशव्यापी संपात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या.
संपाच्या निमित्ताने आशा वर्कर्सनी सिटू राज्य सचिव आरमायटी इराणी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली, तसेच सहसंचालक महेश बोटले यांना निवेदन देऊन मुंबई व राज्यातील आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. शिष्टमंडळात आरती कांबळे, सारिका इंगळे, अदिती तटकरे, मृणाल जंगम यांचा समावेश होता.
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन, कोरोना भत्ता, ५० लाखांचा विमा व १० लाखांचा कौटुंबिक आरोग्य विमा या मागण्यांबरोबर स्थानिक प्रश्न मांडण्यात आले.